5 विरुदद्ध 2 मतांनी देसाईंना मंजूरी : उच्च न्यायालयामुळे मिळाला दिलासा, बीसीसीआयमध्ये मिळणार महत्वाचे पद
पणजी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सदस्य पदासाठी गोवा क्रिकेट संघटनेतून (जीसीए) एक प्रतिनिधी पाठवण्यासाठी खास तातडीची बैठक काल शुक्रवारी दुपारी 2 वाजता घेऊन नाव निश्चित करा, असा दिलासादायक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्या. भारती डांगरे आणि न्या. आशिष चव्हाण यांनी रोहन गावस देसाई यांना दिला. गोव्याचे रोहन गावस देसाई हे बीसीसीआयच्या संयुक्त सचिवपदी सध्या कार्यरत आहेत. जीसीएचा एक प्रतिनिधी बीसीसीआयच्या मंडळावर पाठवण्यासाठी एका सदस्याचे नाव शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत पाठवण्यास बीसीसीआयने जीसीएला सांगितले होते.
प्रकरण पोहोचले न्यायालयात
बीसीसीआयला गोवा प्रतिनिधीचे नाव पाठवण्याचा अधिकार जीसीएच्या अध्यक्ष आणि सचिवांना आहे. मात्र, सदर नाव पाठवण्याचा दिवस जवळ आला तरी जीसीएच्या व्यवस्थापक मंडळाची बैठक अध्यक्ष आणि सचिव बोलवत नसल्याने रोहन गावस देसाई यांचे समर्थक ऊपेश नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
जीसीए निवडणूक अंतिम टप्प्यात
उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच जीसीएची 24 ऑगस्ट रोजी नियोजित निवडणूक रद्द होऊन ती आता 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. सदर निवडणुकीसाठी एकूण 41 वैध उमेदवारी अर्जाची यादी जाहीर करण्यात आली आहे. जीसीएच्या 107 क्लबांना मतदानाचा हक्क आहे. सध्या जीसीए निवडणुकीच्या अंतिम स्तरावर पोचली असून चेतन देसाई-विनोद (बाळू ) गटाची रोहन गावस देसाई गटाशी तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.
न्यायालयाने दिला रोहन यांना दिलासा
जीसीएच्या व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, संयुक्त सचिव आणि एक सदस्य मिळून सहा सदस्य तसेच आयसीएचे दोन मिळून आठ सदस्य आहेत. यामध्ये पाच जणांचे बहुमत रोहन गावस देसाई यांच्या पाठीशी असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. या वादात तूर्तास न पडता न्यायालयाने सकाळी याचिकादार आणि प्रतिवादी या दोन्ही पक्षाच्या वकिलांना आणखी नोटिस न देता शुक्रवारी दुपारी 2 वाजता जीसीएच्या पर्वरी येथील मुख्यालयात व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांना पाचारण करून एका नावावर शिक्कामोर्तब करण्याचा ठराव घेण्याचा आणि सदर ठराव मुदत संपण्याच्या आत बीसीसीआयला पाठवण्याचा आदेश खंडपीठाने दिला.
रोहन 5 विरुद्ध 2 मतांनी विजयी
अखेरीस दोन दिवसांच्या तणावपूर्ण नाट्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जीसीएच्या व्यवस्थापन समितीची शुक्रवारी 2 वाजता मुख्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत रोहन गावस देसाई यांना बीसीसीआयमध्ये गोव्याचे प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचा प्रस्ताव दिला गेला. त्याला विरोध म्हणून सचिव शंबा देसाई यांनी विपुल फडके यांचे नाव सूचित केले. बैठकीच्या मिनिट्समध्ये दोन्ही नावांची नोंद झाली असली तरी त्याची प्रत रोहन समर्थकांना देण्यात आली नसल्याने थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अखेरीस रोहन यांच्या बाजूने बहुमत असल्याने ते 5 विरुद्ध 2 मतांनी विजयी झाले. गोव्याचे प्रतिनिधी म्हणून रोहन यांना पुन्हा संधी देण्यात आली. बीसीसीआयची येत्या 28 सप्टेंबर रोजी निवडणूक असून त्यात रोहन यांना नव्याने महत्वाचे पद मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनाच प्रतिनिधी म्हणून पाठवा, असे बीसीसीआयनेही जीसीएला कळविले होते.









