अनेकांच्या जबान्या, रेती उपसा कामगारांची चौकशी
प्रतिनिधी /कुडचडे
बाणसाय, कुडचडे येथे 31 रोजी रात्री उशिरा बेकायदेशीर रेती उपसा करत असलेल्या मजुरांवर अज्ञात इसमाने गोळी झाडल्याने एकाच मृत्यू झाला होता व एक कामगार गंभीर अवस्थेत बांबोळी येथे उपचार घेत आहे. या घटनेला रविवारी तीन दिवस उलटले. मात्र अजूनही मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता आलेले नसून या घटनेची कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
कुडचडे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाचा छडा अजून लावता आला नसल्याने लोक तपासावर बोटे उठवू लागले आहेत. कुडचडेत याअगोदर करमली नामक एका महिलेच्या खून प्रकरणाची घटना गाजून ते प्रकरण आजपर्यंत तसेच पडून राहिलेले आहे. ताज्या प्रकरणात ठार झालेली व्यक्ती ही बिगरगोमंतकीय असल्यामुळे हे प्रकरण त्याचप्रमाणे लटकत राहणार की काय अशी चर्चा सध्या कुडचडे परिसरात सुरू झाली आहे. या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोलीस कधी पोहोचतात याकडे लोकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, सदर प्रकरणात पोलिसांनी बऱयाच जणांच्या जबान्या घेतल्या असून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रेती उपशासाठी वापरल्या जाणाऱया कामगारांना चौकशीसाठी आणले गेले होते. त्यात खून झालेल्या ठिकाणी ज्याची उपस्थिती होती त्या तिसऱया कामगाराचाही समावेश होता. सध्या कुडचडेत खुनाच्या घटनेमुळे व त्यातील आरोपीला अटक झालेली नसल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचे भयाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.









