डॉ. फिलाटोव्ह निकोलाय निकोलायाविच यांचे मत : व्हीटीयूमध्ये दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ
बेळगाव : पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक घटक आहे. मात्र हवामानातील बदल, प्रदूषण, पाण्याचा अतिवापर, गैरवापर यामुळे पाण्याची उपलब्धता व गुणवत्ता धोक्यात आली आहे. पाण्याच्या बचतीसाठी आतापासूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. ही काळाची गरजही आहे. अन्यथा, भावी पिढीला पाण्याची कमतरता निश्चितच भासणार आहे, असे मत रशियन अकादमी प्रेस्टोजओडस्क वॉटर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. फिलाटोव्ह निकोलाय निकोलायाविच यांनी व्यक्त केले. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) बेळगाव व बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात गुरुवार दि. 13 पासून पर्यावरण शाश्वतता आणि हवामानातील बदलानुसार अनुकूल धोरण यावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने डॉ. निकोलायाविच बोलत होते.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विद्याशंकर एस. अध्यक्षस्थानी होते. कॅनडाच्या इनलँड वॉटरचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. आर. मुर्थी, राज्य प्रदूषण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. शिवलिंगय्या, विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. बी. ई. रंगस्वामी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पृथ्वीच्या पृष्ठभागात 71 टक्के पाणी आहे. त्यापैकी 2.5 टक्के गोडे पाणी असून त्याहून कमी पाण्याचा वापर मानवाला होत असतो. वाढती जागतिक लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी यामुळे भावी काळात पाण्याची कमतरता भासणे साहजिकच आहे. भावी पिढीला स्वच्छ हवा, पाणी, पर्यावरण उपलब्ध करून देणे आपली जबाबदारी असल्याचे डॉ. निकोलायाविच म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून डॉ. विद्याशंकर म्हणाले की, हवामानात झपाट्याने बदल होत आहे. बेसुमार वृक्षतोड, औद्योगिकरणामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र, या परिणामाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. यासाठी सरकार, पर्यावरणतज्ञ, संशोधकांनी, संयुक्तपणे कृती हाती घेणे गरजेचे आहे. प्रास्ताविकात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. शिवलिंगय्या यांनी हवामानातील बदलावर विचार मांडले. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे चक्रीवादळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, भूस्खलन यासारखे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पाण्याचे नियोजन योग्यरितीने करणे हे आपल्या सर्वांवर अवलंबून आहे. दोन दिवसीय या परिषदेसाठी दहाहून अधिक संशोधन लेख सादर होणार आहेत व 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय विषयतज्ञांचा सहभाग राहणार आहे.









