वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशा शासनाने आपल्या राज्यात बुद्धिबळ या क्रीडा प्रकाराला अधिक प्रोत्साहन देण्याचे ठरविले असून आता शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर या क्रीडा प्रकाराचा समावेश केला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शुक्रवारी केली.
तामिळनाडूमध्ये होणाऱया बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीचे आगमन भुवनेश्वरमध्ये झाले. किरण मनीषा मोहंतीने येथील लोकसेवा भवनमध्ये क्रीडाज्याने आणल्यानंतर मुख्यमंत्री पटनाईक यांनी ती पद्मिनी राऊतकडे सुपूर्द केली. किरण मोहंती व पद्मिनी राऊत दोघेही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहेत. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचे औचित्य साधून बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे भारताला पहिल्यांदाच यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडा ज्योत ओडिशा बुद्धिबळ संघटनेचे प्रमुख अच्युत सामंत यांनी स्वीकारून त्यानंतर त्यांनी ही क्रीडा ज्योत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे सुपूर्द केली.
चेन्नईमध्ये होणाऱया बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ओडिशाचे सहा बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. 2016 साली विश्व कनिष्ठांची बुद्धिबळ स्पर्धा ओडिशामध्ये भरविली गेली होती. राज्यातील युवा वर्गामध्ये बुद्धिबळाचा अधिक प्रसार करण्याच्या हेतूने राज्य शासनाने आता शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर बुद्धिबळचा समावेश करण्याचे ठरविले आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रॅलीचे उद्घाटन 19 जून रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी ही क्रीडाज्योत ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदकडे सुपूर्द केली होती. चेन्नईमध्ये होणाऱया बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत जगातील सुमारे 200 देशांचे बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.









