विश्व भारती क्रीडा संघाची हेब्बाळ येथे बैठक
वार्ताहर /नंदगड
खानापूरसह बेळगाव जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी व तरुणांमध्ये विविध कला व खेळांचे सुप्त गुण आहेत. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन लाभत नसल्याने ते राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. विश्व भारती कला क्रीडा संघाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट क्रीडापटू घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विश्व भारती क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली.
हेब्बाळ, ता. खानापूर येथील लक्ष्मी मंदिरात विश्व भारती क्रीडा संघटनेची बैठक झाली. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक आर. एन. करंबळकर होते. हेब्बाळ येथील मेजर वसंत गुरव हे दि. 21 मे 2010 रोजी शहीद झाले. त्यांची माता पार्वती गुरव यांचा वीरमाता म्हणून संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
प्रारंभी खेळाविषयी जागृती व्हावी यासाठी गावातून जागृती फेरी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत संघटनेचे नंदगड विभागप्रमुख विनोद गुरव, बिडी विभागप्रमुख डुमिंग नाजरेत, गर्लगुंजी विभागप्रमुख एल. डी. पाटील, जांबोटी विभाग प्रमुख भैरू पाटील, प्रा. कमलाकांत पाटील, दामोदर कणबरकर, आर. एन. करंबळकर, गंगाराम गुरव, चिमाण्णा भालकेकर, विनायक भुत्तेवाडकर, शिवाजी गुरव, नारायण राऊत, गंगाराम गुरव आदींनी विचार मांडले. विलास बेळगावकर म्हणाले, विश्व भारती क्रीडा संघटनेने बेळगाव जिल्हय़ातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करत चालविलेली धडपड स्तुत्य आहे. याद्वारे एखादा ऑलिम्पिकपटू निश्चितच तयार होईल.









