मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन
पणजी : गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात वैज्ञानिक संस्कृती निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. आजच्या युवा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे आवश्यक प्रयत्न सुरू असून, मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवासारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त काल बुधवारी दोनापावला येथील एनआयओच्या सभागृहात मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, पण, त्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थितांना संबोधले.
वैज्ञानिक साधाणार विद्यार्थ्यांशी संवाद
राज्यात वैज्ञानिक संस्कृती ऊजवण्याबरोबरच आजच्या युवा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण व्हावी, हा या विज्ञान महोत्सवामागील उद्देश आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधण्यासाठी 19 नामवंत वैज्ञानिकांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, डॉ. सुनील कुमार सिंग, इस्रोचे अध्यक्ष श्रीधर सोमनाथ, भारतीय अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळवणारे बंगळुरू येथील यू. आर. राव. सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. माधवराज एस., विज्ञान तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याचे डॉ. संजय गोयल, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे प्रा. उमेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजकारण्यांना तज्ञांचा सल्ला आवश्यक
युवा पिढीने विज्ञान, तंत्रज्ञान याच्या आधारे शाश्वत विकास प्रत्यक्षात आणावा हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. ते नाविन्याचा ध्यास घेणारे आणि शिस्तीवर विश्वास ठेवणारे नेते होते. राज्याचे धोरण ठरवण्यासाठी मंत्र्यांना तसेच राजकारण्यांना शास्त्रज्ञ तसेच तज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. तज्ञांचा सल्ला आणि तंत्रज्ञानाने राज्याचा विकास शक्य असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. वेगवेगळ्या अनुभवांतून आलेला भारत आणि जगाकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही युवा पिढीला द्या, असे आवाहन मंत्री राणे यांनी व्यासपीठावरील वैज्ञानिकांना केले. यावेळी पर्रीकर महोत्सवाच्या पाच वर्षांच्या कार्यक्रमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. येत्या विज्ञान महोत्सवासाठी वैज्ञानिक आणि तज्ञ यांच्या नावाची शिफारस कारण्यासाठी संजय गोयल आणि उमेश वाघमारे यांच्यात समन्वय करार करण्यात आला.
यंत्रामध्ये बुद्धिमत्ता विकास शक्य
इस्रोने गेल्या 60 वर्षांच्या कार्यकाळात चंद्र मोहिमेसह अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. उपग्रह तसेच रॉकेट तयार करण्याचे तंत्रज्ञान आता देशात तयार होत आहे. यंत्रांमध्ये बुद्धिमत्ता विकसित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी झाल्यास, तत्पूर्वी काही क्षण आधीच तसे सिग्नल मिळणे शक्य होईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. श्रीधर सोमनाथ यांनी दिली.
‘मनोहर पर्रीकर वैज्ञानिक पुरस्कार’
पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार इस्रोच्या बंगळूरू येथील यू. आर. राव स्पेस सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. माधवराज एस. यांना प्रदान करण्यात आला.









