शाळा-कॉलेजमध्ये जागृती मोहीम : पोलीस आयुक्तांची पत्रकारांना माहिती
बेळगाव : गांजापाठोपाठ हेरॉईन विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच दुसरीकडे अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविषयी शाळा-कॉलेजमध्ये जागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. शुक्रवारी आपली भेट घेतलेल्या पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, टिळकवाडीत हेरॉईन विक्री करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. माळमारुती पोलिसांनी गांजा विकणाऱ्या दोघा जणांना अटक केली आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींची चौकशी करण्यात आली असून विक्रेत्यांना अमलीपदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
बेळगावात पूर्वी केवळ गांजा येत होता. आता हेरॉईनसह इतर अमलीपदार्थांचीही विक्री सुरू झाली आहे. विक्रेते विद्यार्थ्यांना टार्गेट करीत असतील, ही शक्यता आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये पोलीस दलाच्यावतीने जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. राज्य पोलीस महासंचालकांकडूनही यासाठी सूचना आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. चालूवर्षी जुलैअखेरपर्यंत बेळगाव शहर व तालुक्यात 110 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 700 किलो इतर अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमलीपदार्थ विकणाऱ्यांची एक साखळीच आहे. ही साखळी तोडण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले.









