165 कोटीचा आराखडा तयार : 125 कोटी निधीअंतर्गत विकासकामे राबविली जाणार
बेळगाव : कणबर्गी वसाहत योजना मार्गी लावण्यासाठी बुडाने आटापिटा चालविला आहे. 125 कोटी निधीअंतर्गत विकासकामे राबविली जाणार आहेत. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यास निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी निविदा काढण्यासाठी हालचाली सुरू असून, 21 दिवसांच्या मुदतीसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.
कणबर्गी वसाहत योजना राबविण्यासाठी बुडाने 2007 मध्ये भू-संपादनासाठी अधिसूचना जारी केली होती. 16 वर्षे होत आली तरी अद्याप ही योजना मार्गी लागली नाही. मुळात या योजनेला शेतकऱ्यांचा विरोध आहे. पिकावू शेतजमीन देणार नसल्याची भूमिका घेऊन काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र आक्षेप घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वगळून योजना राबविण्यासाठी बुडा प्रशासनाने खटाटोप चालविला आहे. योजनेचा आराखडा तसेच योजना मार्गी लावण्यासाठी निविदा काढण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी घेतली आहे. या योजनेमध्ये रहिवासी भूखंड, व्यावसायिक भूखंड, खुल्या जागा, उद्यानांची तरतूद केली जाणार आहे. तसेच रस्ते, गटारीचे बांधकाम, ड्रेनेज वाहिन्या, विद्युत सुविधा अशी विविध विकासकामे राबविण्यासाठी बुडाने 165 कोटीचा आराखडा तयार केला आहे. यापैकी 125 कोटीच्या निविदा काढण्यासाठी शासनाकडून मंजुरी घेतली आहे. मागील आठवड्यात या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असून, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी निविदा काढून ही योजना मार्गी लावण्यासाठी बुडा प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. वास्तविक पाहता 125 कोटीच्या निविदेसाठी मुदत देणे आवश्यक आहे. मात्र निवडणुका जाहीर झाल्यास आचारसंहितेच्या कचाट्यात निविदा प्रक्रिया अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुडाने निविदा भरण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया राबवून उघडण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने बुडाने आटापिटा चालविला आहे. दुसरीकडे ही योजना रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
योजना मार्गी लागणार की रखडणार?
न्यायालयात याचिका प्रलंबित असताना योजना राबविण्यास शासनाने मंजुरी कशी दिली? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत बुडा आणि जिल्हा प्रशासनाकडे शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनेही दिली आहेत. त्यामुळे ही योजना मार्गी लागणार की रखडणार? याकडे लक्ष लागले आहे.









