खासदार जगदीश शेट्टर यांची विविध बँकांच्या प्रतिनिधींना सूचना
बेळगाव : बँकिंगच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सदस्य बँकांनी बँक शाखांमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांचा निवाडा त्वरित करावा. तसेच प्रलंबित असलेले सरकारी योजनांचे अर्ज विचारात घेऊन ते मार्गी लावावेत, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केली. 2024-25 मधील चौथ्या त्रैमासिक डीसीसी-डीएलआरसीची बैठक गुरुवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात झाली. याप्रसंगी खासदार शेट्टर बोलत होते. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले की, प्रलंबित असलेल्या सर्व सरकारी प्रायोजित योजनांचे अर्ज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
तसेच शुगरकेन हार्वेस्ट मशीनसंबंधीच्या वेळेत विचार करून निवाडा दिलेल्या बँकांचे अभिनंदन केले. बेळगाव जिल्हा हा अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेमध्ये राज्यात चौथ्या स्थानावर आहे. तसेच पीएमएफएमई योजनेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती कृषी खात्याचे संयुक्त संचालक एच. डी. कोळेकर यांनी दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे साहाय्यक जनरल मॅनेजर प्रभाकरन यांनी आरबीआयच्या मार्गसूचीमध्ये अलीकडे झालेल्या बदलांची माहिती दिली. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अभिनव यादव यांनी नाबार्डच्या योजनांची माहिती दिली. सभेला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याचवेळी 2025-26 मधील वार्षिक क्रेडिट प्लॅनच्या आराखड्याचे अनावरण करण्यात आले.









