लाठीमेळा, तलवारबाजी, झांजपथकांचा सराव : मिरवणुकीला गतवैभव मिळवून देणार
बेळगाव : डीजेमुळे बेळगावमधील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे महत्त्व कमी होत असल्यामुळे पारंपरिकपणा जपण्यासाठी आता काही मंडळांनी पुढाकार घेतला आहे. लाठीमेळा, तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले जात आहे. दुसरीकडे मंडळांकडून सजीव देखावे सादर करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली जात आहे. यावर्षी डीजेमुक्त चित्ररथ मिरवणूक करण्यासाठी शिवभक्तांचा प्रयत्न सुरू आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी मंगळवार दि. 29 रोजी परंपरेने शिवजयंती साजरी होणार आहे. गुरुवार दि. 1 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. बेळगावमध्ये 35 ते 40 मंडळे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करतात. परंतु, मागील काही वर्षात काही मंडळांमुळे डीजे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सजीव देखावे सादर करताना अनेक अडथळे येत आहेत. डीजेमुळे आवाजाचा भडिमार होत असल्यामुळे सजीव देखावे सादर करणे शक्य नसते.
यामुळे या कार्यक्रमासाठी लाखो रुपये केलेला खर्च वाया जातोच, त्याचबरोबर सजीव देखाव्यात सहभागी झालेल्यांचा हिरमोड होत आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार यावर्षी डीजेमुक्त शिवजयंती साजरी करण्याकडे मंडळांचा कल आहे. म्हैसूरच्या दसरोत्सवानंतर सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव बेळगावमध्ये शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीच्या निमित्ताने दिसून येतो. परंतु, डीजेमुळे तरुणाईचे बीभत्स नृत्य आणि मिरवणुकीला आलेला ढिसाळपणा यामुळे शिवभक्तांची संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे. त्यामुळे चित्ररथ मिरवणुकीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी मंडळांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. चव्हाट गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाने यावर्षी सजीव देखावे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळाच्या चित्ररथावर एकूण 40 पात्रे साकारली जाणार असून एक भव्यदिव्य देखावा शिवभक्तांना अनुभवता येणार आहे. याबरोबरच अनसूरकर गल्ली येथील मंडळाने लहान मुलांना लाठीमेळ्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर दरवर्षी सजीव देखावे सादर करणारी शहरातील विविध मंडळे तयारीला लागली आहेत. त्यामुळे यावर्षी डीजेमुक्त चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे.









