प्रतिनिधी / पणजी
अमेरिका, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब यासारखे देश आपल्या नागरिकांना विदेशी पर्यटनासाठी प्रोत्साहित करत असल्याचे दिसून आले असून हे चित्र भारतासाठी आणि पर्यायाने गोव्यातील पर्यटन वाढीसाठी आशादायक ठरू शकते, असे मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुऊवारी गोवा पर्यटन मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी खंवटे यांनी वरील मत व्यक्त केले. बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्यासह पर्यटन व्यावसायिक आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी धोरणात्मक उपक्रम, धोरणांवर चर्चा करणे आणि सहकार्य वाढवण्यावर भर देणे या उद्देशाने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना खंवटे यांनी, सदर देशांमधून पर्यटक गोव्यात येतील अशी अपेक्षा आपण ठेऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. त्यादृष्टीने अतिरिक्त साधनसुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर अतिक्रमण झाले आहे. त्यातून किनाऱ्यांची झीज होत आहे. ही अतिक्रमणे रोखून सर्व समुद्रकिनारे लोकांसाठी उपलब्ध झाले पाहिजेत, याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी किनाऱ्यांलगतच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येईल याची खातरजमा करू, असे खंवटे यांनी पुढे सांगितले.









