गाझावासियांना सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा अंतिम इशारा
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात आठवडाभरापूर्वी सुरू झालेले युद्ध आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. इस्रायलचे हवाई दल गाझापट्टीवर सातत्याने हल्ले करत असल्यामुळे तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. गाझाचा एकमेव पॉवर प्लान्ट बंद झाल्यानंतर ऊग्णालयांमध्ये लोकांवर उपचार करणे कठीण झाले आहे. तेथे पाणी, वीज या मुख्य गरजांसह अन्नधान्य पुरवठ्याची कोंडी करण्याची तयारी केली जात असून गाझातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी इस्रायलने अंतिम इशारा दिला आहे. याचदरम्यान, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या नेत्यांशी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र चर्चा करत असून गंभीर परिस्थितीवर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये प्राण गमावलेल्या लोकांची संख्या सुमारे 1300 आहे, तर 3,418 लोक जखमी झाले आहेत. त्याचवेळी, गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 1,537 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 6,612 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये 1,500 हून अधिक हमासचे हस्तक मारले गेले आहेत. एकंदर, दोन्ही बाजूंचे साडेचार हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. दोन्ही बाजूंकडून हल्ले सुरू असल्यामुळे जीवितहानीचा आकडा वाढत असला तरी तो अधिकृतपणे जारी केला जात नाही. तेल अवीवमध्ये अलर्ट सायरन वाजत आहेत. येथे बॉम्बस्फोटाचा आवाजही ऐकू येत आहे. गाझावरील इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे संपूर्ण परिसर धुळीत माखत आहे. तसेच लेबनॉनमध्येही असाच काहीसा प्रकार घडत आहे. सीरियावरही हल्ला करण्यात आला असून इस्रायलने चौफेर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना सुरक्षित भागात जाण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. तथापि, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हेगेरी यांनी संयुक्त राष्ट्राच्या अहवालावर काहीही सांगितले नाही. पॅलेस्टिनी 24 तासात उत्तर गाझा परिसर रिकामा करू शकत नाहीत, असे इस्रायली लष्कराने शुक्रवारी संध्याकाळी कबूल केले. त्यामुळे इस्रायलने जोरदार हल्ल्याची तयारी केली असली तरी त्यांच्यासमोर अनेक मर्यादा येत आहेत.
‘युएन’ची मध्यस्थी
आम्ही त्यांना आणखी वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण 24 तासात परिसर रिकामा करणे शक्मय नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या भागात 10 लाखांहून अधिक लोक राहतात. ही गाझाची लोकसंख्या निम्मी आहे. त्यांना इतक्मया कमी वेळात निघून जाण्याचा आदेश देणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. यामुळे मानवतावादी संकट निर्माण होईल, असे यूएनचे प्रवक्ते म्हणाले.
अमेरिकन मंत्रीही चर्चेत सक्रीय
युद्धाच्या सातव्या दिवशी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. इस्रायलकडे स्वत:चा बचाव करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत याची अमेरिका खात्री करेल. इस्रायलला आपल्या लोकांचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचा दावा ऑस्टिन यांनी केला आहे.









