नावेलीचे सुपुत्र डॉ. फ्रान्सिस्क लुईस गोम्स यांच्या नावाचा सार्थ अभिमान
प्रतिनिधी/ मडगाव
पोर्तुगीज संसदेत पोतुगीज भारताचे प्रतिनिधीत्व करणारे तसेच गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणारे मूळ गोमंतकीय स्व. डॉ. फ्रान्सिस्क लुईस गोम्स यांच्या स्मृत्यर्थ नावेली गावात एक आकर्षक संग्रहालय उभारण्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार लुईझिन फालेरो यांनी केंद्र सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे.
‘तरुण भारत’कडे बोलताना गोव्याच्या या माजी मुख्यमंत्र्यांने शनिवारी ही माहिती दिली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ‘इस्कोला मेडिको सिरुरजिका दे गोवा’ (आताचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय) येथून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करुन मडगाव मतदारसंघातून पोर्तुगीज संसदेसाठी 1861 मध्ये निवडून आलेले डॉ. गोम्स यांनी पोर्तुगीज संसदेत केलेल्या आधुनिक विचारसरणीच्या भाषणाने संपूर्ण युरोपमध्ये ते ओळखले जाऊ लागले होते. जातीय पद्धतीवर विशेषतः अस्पृश्यतेवर प्रकाशझोत टाकणारा पहिली कादंबरी लिहिणारे ते पहिले भारतीय होते. एका विशिष्ट समाजाकडे असलेली सत्ता सर्वसामान्यांकडे गेली पाहिजे अशी त्यांची विचारधारा होती. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष जन्माला येण्यापूर्वी 35 वर्षापूर्वी त्यांनी (डॉ. गोम्स) भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी पोतुगीज संसदेत प्रयत्न केले होते. ज्या देशात प्रसिद्ध महाभारत लिहिण्यात आले, ज्या देशात बुद्धिबळाचा शोध लावण्यात आला, ज्या देशात एकेकाळी तत्वज्ञानाची गंगा वाहत होती त्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अथक प्रयत्न करणारे ते पहिले भारतीय होते आणि अशा या थोर भारतीयाला योग्य तो मान मिळण्यात यावा, अशी विनंती श्री. फालेरो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रात केलेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या आशयासंबंधीचा एक ठराव श्री. फालेरो यांनी राज्यसभेत मांडला होता. मात्र, त्या दिवशी राज्यसभा तहकूब केल्यामुळे हा ठराव चर्चेस येऊ शकला नव्हता हेही श्री. फालेरो यांनी यावेळी सांगितले.
पोर्तुगीज सरकारात मंत्रिपद स्वीकारण्याच्या डॉ. गोम्स यांच्या वाटय़ाला एकूण तीन संधी आल्या. मात्र, त्यांच्या तत्वात बसत नसल्याच्या कारणास्तव त्यांनी तिन्हीवेळा पोर्तुगीज देशाच्या मंत्रिपदाची संधी नाकारली आणि त्यातच त्यांचा मोठेपणा दिसून येत असल्याचे श्री. फालेरो यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
उचित आदरांजली ठरेल
30 मार्च 2022 पर्यंत आपला खासदार निधी पश्चिम बंगालसाठी वापरण्यात आला आहे आणि नियमानुसार हा निधी तेथे खर्च करावा लागतो. यातील काही टक्का निधी इतर राज्यासाठी खर्च करता येतो. हा निधी गोव्यासाठी (इतर राज्यात) वापरायचा झाल्यास खास परवानगी घेण्याची गरज असते. अशी परवानगी मिळाल्यास स्व. डॉ. फ्रान्सिस्क लुईस गोम्स संग्रहालय संकुलाचा प्रकल्प पूर्ण होईल आणि असे झाल्यास भारताच्या या थोर पुरुषाची ओळख जगाला होईल आणि त्यांना उचित आदरांजली दिल्यासारखेही होईल, असेही विचार श्री. फालेरो यांनी भारताच्या पंतप्रधानांना कळविलेले आहेत, असे श्री. फालेरो यांनी सांगितले.
असे संकुल उभारायचे झाल्यास आपली काही जागा आहे आणि ती जागा आपण या संग्रहालयासाठी देणार आहे. मात्र, या संकुलाच्या आराखडय़ासाठी कुशल कर्मचारी दिल्लीहून गोव्यात पाठविण्यासाठी आपण केंद्र सरकारला आवाहन करणार असल्याची माहिती श्री. फालेरो यांनी सांगितले.
श्री. फालेरो हे राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनी या थोर व्यक्तीची माहिती असलेले पुस्तक राज्यसभेचे अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखार यांना दिलेले आहे.
नावेली गावचे सुपुत्र असलेले आणि किमान सहा भाषेचे ज्ञान असलेल्या डॉ. गोम्स यांच्या या स्मारकासाठी केंद्र मदतीचा हात देणार याबद्दल लुईझिन फालेरो आशावादी आहेत.









