अतिरिक्त शिकवणी वर्गांचे नियोजन : अधिकारी करणार प्रत्यक्ष पाहणी
बेळगाव : यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची दहावी निकालाच्या क्रमवारीत घसरण झाली. त्यामुळे पुढील वर्षी तरी निकालात सुधारणा व्हावी, यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शिक्षण विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर अतिरिक्त अभ्यासवर्ग भरविले जात आहेत. याचबरोबर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून या अतिरिक्त वर्गांची पाहणी केली जाणार आहे.
दहावी निकालात काही वर्षांपूर्वी बेळगाव शैक्षणिक जिल्हा पहिल्या दहा क्रमवारीत असायचा. परंतु, हळूहळू निकालाची क्रमवारी घसरत गेली. 2021-22 साली 18 व्या स्थानी असणारे बेळगाव 2022-23 मध्ये 26 व्या स्थानी पोहोचले. 31,678 पैकी 27,048 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 85.85 टक्के इतका लागला. निकालात झालेली घसरण खेदाची बाब असल्याने निकाल वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने यावर्षी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. आठवी व नववीपासूनच अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट तयार करून त्यांच्यासाठी विशेष वर्ग भरविले जात आहेत. सर्व सरकारी, अनुदानित व खासगी शाळांना शिक्षण विभागाने विशेष वर्ग भरविण्याचे निर्देश दिले आहेत. खासगी शिकवणी लावणे प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने शाळेमध्येच त्यांना सकाळी व सायंकाळच्या सत्रात एक तास शिकवणी घेतली जात आहे. यावर्षी 37 हजार विद्यार्थी दहावी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे निकाल वाढविण्याचे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे.
गृहभेट उपक्रम राबविला जाणार
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच दहावी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्ग भरविण्याच्या सूचना सर्व शाळांना करण्यात आल्या आहेत. याचबरोबर गृहभेट उपक्रम राबविला जाणार आहे. अतिरिक्त शैक्षणिक वर्ग भरविले जात आहेत की नाहीत, हे पाहण्यासाठी अधिकारीवर्ग स्वत: भेटी देणार आहेत.
– बसवराज नलतवाड (जिल्हा शिक्षणाधिकारी)









