7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन वर्षभरात जिल्ह्यात 502 शिशू तर 47 मातांचा मृत्यू : दुर्गम भागात चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करणे गरजेचे
अमृत वेताळ/बेळगाव
आरोग्यपूर्ण सुरुवात, सुरक्षित भवितव्य हे यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. हे घोषवाक्य माता आणि नवजात शिशू यांना समर्पित करण्यात आले आहे. गर्भवतींची प्रसूती सुलभपणे होऊन बालमृत्यूचे प्रमाण रोखण्याच्यादृष्टीने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांनी प्रयत्न करावेत, या हेतूने जागतिक आरोग्य संघटनेने यंदा हे घोषवाक्य दिले आहे. त्यानिमित्त…
मातृत्त्व हे एक अमूल्य आणि अद्वितीय वरदान आहे. जे स्त्रीच्या जीवनात एक नवीन अर्थ आणि आनंद भरून टाकते. त्यामुळे माता आणि शिशूंच्या मृत्यूच्या प्रमाणात घट व्हावी, यासाठी सरकारदरबारी प्रयत्न होत असले तरी प्रत्यक्षात मात्र माता आणि शिशूंचा मृत्यू होण्याचा दर मात्र अद्यापही घटलेला नाही. बेळगाव जिल्ह्यात एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत वर्षभरात एकूण 59,385 महिलांची प्रसूती झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे 47 मातांचा तर 502 शिशूंचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी चक्रावून सोडणारी असून माता व शिशूंच्या आरोग्यासाठी आरोग्य खात्याकडून आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
माता आणि शिशू मृत्यू समस्या गंभीर आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. पण काही ठिकाणी हे प्रमाण अद्यापही नियंत्रणात आलेले नाही. गर्भधारणा, बाळंतपणानंतर आईचा मृत्यू होणे, जन्मानंतर पहिल्या 28 दिवसात किंवा पहिल्या वर्षात मृत्यू होणे, रक्तस्त्राव, गर्भधारणे दरम्यान उच्च रक्तदाब, संसर्ग आणि प्रसूतीनंतर गुंतागुंतीमुळे माता आणि शिशू मृत्यू होऊ शकतात. विशेषकरून दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्य सेवा अद्यापही म्हणाव्या तशा पोहोचल्या नाहीत, त्या ठिकाणी माता व शिशूंचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तशा ठिकाणी चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर योग्य गर्भनिरोधक उपाययोजना करणे, जेणेकरून महिलांना अनावश्यक गर्भधारणा आणि प्रसूती टाळता येतील. त्याचबरोबर माता आणि बालकांच्या आरोग्याबद्दल माहिती देणे आणि जागरुकता वाढविणे गरजेचे आहे. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, अद्यापही माता व शिशूंचे प्रमाण घटले नसल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 59,385 महिलांची प्रसूती झाली असून यापैकी 502 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 47 मातांचा मृत्यू झाला आहे.
मातांच्या मृत्यूस सेपसिस, पीपीएच, एपीएच, अॅनिमिया, हृदयरोग व इतर कारणे कारणीभूत आहेत. बालकांच्या मृत्यूस कमी वजन, वेळेआधीच जन्म होणे, न्युमोनिया, सेपसिस, हृदयरोग यासह इतर कारणे कारणीभूत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. गर्भधारणेनंतर माता आणि शिशूंचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकारातून मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातेने सकस आहार घेणे आवश्यक आहे. तरच जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारेल आणि माता व बालमृत्यू दरात घट होण्यास मदत होईल, या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काही प्रमाणात लाभदायक ठरत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारचा पुढाकार
सदर योजना केंद्र व राज्य सरकारच्या सहभागाने राबविण्यात येत असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के सहभाग आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय किमान 18 ते कमाल 55 वर्षे असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास लाभार्थी महिलेच्या पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये (पहिला हप्ता 3 हजार व दुसरा हप्ता 2 हजार रुपये) तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात 6 हजार रुपयांचा लाभ आधारलिंक असलेल्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात डीबीटीद्वारे जमा केला जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने अधीसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी केलेली असावी, तसेच शेवटच्या मासिक तारखेपासून सहा महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केलेली असावी, दुसऱ्या हप्त्यासाठी बाळाची जन्म नोंदणी, बालकास बीसीजी, ओपीव्ही झीरो, ओपीव्ही 3 मात्रा, पेन्टाव्हॅलेंटच्या 3 मात्रा अथवा समतुल्य/पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी आशा कार्यकर्त्या किंवा अंगणवाडी शिक्षिका, सेविका यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
मातृवंदना योजना लाभदायक
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने मातृवंदना ही योजना महत्त्वपूर्ण आहे. यामुळे गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. यामुळे जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधारेल. तसेच माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहील, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षभरात बेळगाव जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भवती, बाळंतिणी आणि नवजात शिशूंचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू होत असल्याचा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात याला वेगवेगळी कारणे कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत एकूण 59,385 प्रसूती झाल्या आहेत. यामध्ये बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. मातांचाही मृत्यू झाला असून हे प्रमाण कमी व्हावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याला अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. सरकारने विशेषकरून माता व शिशू मृत्यू प्रमाणात घट व्हावी यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.
गर्भवतींसाठी प्रोत्साहन धन
गर्भवती महिलांसाठी जननी सुरक्षा योजना (जेएसवाय) अंतर्गत शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी 600 रुपये आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी 700 रुपये प्रोत्साहन धन राज्य सरकारकडून दिले जात आहे. त्याचबरोबर गर्भवतींसाठी जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत औषधे, स्कॅनिंग, जेवण, प्रवास व्यवस्था आणि रक्तदेखील दिले जाते, अशी माहिती जिल्हा व कुटुंब कल्याण खात्याकडून देण्यात आली आहे.
गर्भवती महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा!
जिल्ह्यात वर्षभरात 59,385 महिलांची प्रसूती झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याकडे झाली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे यापैकी 47 माता तर 502 बालकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर घटावा यासाठी सरकारच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचबरोबर समाजामध्ये जनजागृतीही केली जात आहे. गर्भवती महिलांनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा.
-डॉ. एस. एस. दोडमनी (जिल्हा सर्वेक्षण अधिकारी)









