माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्त्वात 23 सप्टेंबरला समितीची पहिली बैठक
वृत्तसंस्था /भुवनेश्वर
देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत (वन नेशन-वन इलेक्शन) विचार करण्यासाठी आणि शिफारशी करण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक होणार आहे. या समितीचे प्रमुख माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी ही माहिती दिली. माजी राष्ट्रपती कोविंद शनिवारी दुपारी 1 वाजता भुवनेश्वरला पोहोचले. येथील एएसबीएम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ‘एक देश, एक निवडणूक’वर विचार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक 23 सप्टेंबरला होणार असल्याचे स्पष्ट केले.
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असताना ‘एक देश, एक निवडणूक’वर चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारने 2 सप्टेंबर रोजी लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची शक्मयता तपासण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी 8 सदस्यीय समिती स्थापन केली होती. यापूर्वी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली औपचारिक बैठक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता या समितीचे प्रमुख माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवासस्थानी झाली होती. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवालही सहभागी झाले होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली होती. आता 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील महत्त्वपूर्ण बैठकीत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.









