मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन : पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : पत्रकार हे समाजातील उणीवा दाखविण्याबरोबरच चांगल्या बाबींचा वेध घेत असतात. समाजाच्या समस्या मांडताना स्वत:च्या कुटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते. बेळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्या सुविधेसाठी लवकरच पत्रकार भवन उभारण्यासाठी जागा दिली जाणार असून त्या ठिकाणी भव्य पत्रकार भवन बांधले जाणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी केली. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघातर्फे रविवारी केएलई शताब्दी सभागृहात पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. व्यासपीठावर हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, माहिती व प्रसारण खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, संघाचे उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे उपस्थित होते.
मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, सध्याचे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकाने आपले आदर्श निश्चित केले तर यश मिळविणे सोपे जाते. पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून लक्ष्मीताई फाऊंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांचा निधी पत्रकार संघाला देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. चन्नराज हट्टीहोळी यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी मानसिक ताण घेऊ नका, असे पत्रकारांना आवाहन केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, पत्रकार पेशा हा तसा धकाधकीचा असतो. दिवसभरात प्रत्येक क्षणाक्षणाला घडलेली घटना लोकांपर्यंत पोहोचवायची असते. परंतु, या सर्वांमध्ये पत्रकारांनी आपले कुटुंब व स्वत:कडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी पत्रकारांच्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. पत्रकार भवनासोबतच पत्रकारांसाठी एखादी निवासी वसाहत निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर पत्रकारांच्या मुलांना आयएएस, आयपीएस, केएएसचे शिक्षण घेण्यासाठी व्यवस्था करावी, ग्रामीण भागातील पत्रकारांच्या मुलांना शहरात शिक्षण घेण्यासाठी वसतिगृह सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.









