तक्रार कऊनही कारवाई नाही
फोंडा : काझीवाडा फोंडा येथील कुरतरकर फार्मसी समोरील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात आहे. त्यासंबंधी आरोग्य खाते व फोंडा नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी देऊनही कोणतीच कारवाई केली जात नाही. कुरतरकर फार्मसीसह, विश्वकमल ट्रॅव्हल्स व इतर आस्थापनांच्या प्रवेशद्वारातील गटारातून हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. सांडपाण्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य खात्याने तक्रारीची दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करून अहवालही सादर केलेला आहे. मात्र सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकार बंद झालेले नाहीत. मागील पाच वर्षांपासून संबंधित आस्थापनचालक गटारातून सोडले जाणारे सांडपाणी बंद व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. येथील काही हॉटेल्स व रहिवासी इमारतीमधील सांडपाणी थेट गटारात सोडले जात असल्याचे पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे. फोंडा पालिकेकडून त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत हयगय चालल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.









