पंढरपूर/प्रतिनिधी
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यांनतर महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत.पंढरपुरातही राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच सत्तारांनी माफी मागावी अन्यथा पंढरपुरात एकाही मंत्र्याला पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे, शहर अध्यक्ष सुधीर भोसले यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच जोपर्यंत मंञी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत पंढरपुरात एकाही मंत्र्याला पाऊल न ठेवू देण्याचा इशारा संदीप मांडवे यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे सुरज पेंडाल, उमेश सासवडकर, साधना राऊत, अनिता पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप मांडवे म्हणाले, ५० खोके घेऊन आलेले हे सरकार आहे. त्यांचा राग आणि त्यांचा आवेश वाढत चालला आहे. धोक्याने आलेले हे सरकार आहे. घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आले असून घटनाबाह्य असलेले मंत्री सत्तार यांनी संसदरत्न ठरलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना अर्वाच्च भाषा वापरली आहे. त्या शब्दाचा निषेध म्हणून पंढरपूर राष्ट्रवादीच्यावतीने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महाराष्ट्राच्या महिला आणि खा. सुप्रिया सुळे यांची माफी नाही मागितली नाही तर अब्दुल सत्तारसह इतर एकाही मंत्र्याला पंढरपुरात पाऊल ठेवून देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.