आठ आमदारांना कायमचे घरी पाठवा : पाटकर
मडगाव : काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘त्या’ आठ आमदारांच्या प्रतिमांचे काल गुरुवारी काँग्रेस पक्षाने मडगावात दहन करून भाजप प्रवेशाचा निषेध केला. 14 सप्टेंबर 2022 रोजी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काल त्याला एक वर्षपूर्ण झाले. त्याचा निषेध करण्यासाठी काल काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले होते. मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या आठ आमदारांच्या प्रतिमा हातात घेऊन जोरदार निदर्शने केली. ‘मुर्दाबाद मुर्दाबाद, गोंयचे सरकार मुर्दाबाद’, ‘एक दो, एक दो गद्दारोंको फेक दो’ अशा घोषणा दिल्या. नंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देत छोटी रॅली काढली व त्या आठ आमदारांच्या प्रतिमांचे दहन केले. 14 सप्टेंबर 2022 हा गोव्याच्या राजकारणातील काळा दिवस असल्याचे उद्गार यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काढले. गेल्या विधानसभा निवडणुकीत देवासमोर काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याची शपथ घेतलेले उमेदवार, आमदार झाल्यानंतर देवाला फसवून भाजपमध्ये गेले. हे पुन्हा जेव्हा जनतेच्या दरबारात येतील तेव्हा त्यांना कायमचे घरी पाठवा, असे आवाहन यावेळी अमित पाटकर यांनी केले.
50 खोके ऑल इज ओके
लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्हाला देवळात नेऊन देवासमोर शपथ घेतली. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेऊन काँग्रेसचे 11 आमदार निवडून दिले. ते स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी भाजपमध्ये गेले. काही जणांना मंत्री बनविण्याचे गाजर दाखविण्यात आले. पण, एक वर्ष संपले तरी मंत्रीपद मिळत नाही. काहींना 50 खोके मिळाले व ते ओके झाल्याचे अमित पाटकर म्हणाले. गेल्या विधानसभा अधिवेशनात काँग्रेसच्या तीन आमदारांनी जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांचे अभिनंदन करतो असेही पाटकर म्हणाले. मुर्डी-खांडेपार येथे 144 कलम लावून तेथील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. स्वत:ला सनातनी म्हणणाऱ्या भाजप सरकारला हिंदू लोकांचे काहीच पडून गेलेले नाही हे या कृतीत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एम. के. शेख, सावियो डिसिल्वा, एल्वीस गोम्स, कॅ. व्हिरियातो फर्नांडिस, अमरनाथ पणजीकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक, प्रदीप नाईक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.









