टोमॅटो-भाज्या महागल्याने जेवणात वापर बंद
बेळगाव : वाढत्या भाजीपाल्याच्या दराचा फटका मध्यान्ह आहार योजनेला बसू लागला आहे. विशेषत: टोमॅटो व इतर फळभाज्यांचे वाढलेल्या दरांमुळे सरकारने दिलेले अनुदान आणि प्रत्यक्षात येणारा खर्च यामध्ये तफावत जाणवत आहे. त्यामुळे सरकारने शाळांना अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शाळांमध्ये तर शहरी भागात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मध्यान्ह आहार पुरविला जातो. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 1 हजार 764 शाळांमध्ये मध्यान्ह आहार दिला जातो. यापैकी 1 हजार 495 शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्यामार्फत आहार दिला जातो. तर उर्वरित 169 शाळांमध्ये जेवण तयार केले जाते.
टोमॅटोचे दर प्रतिकिलो 100 ते 120 पर्यंत पोहोचले आहेत. याचबरोबर बिन्स, मिरची, कोथिंबीर, तुरडाळ यांच्याही दरात वाढ झाली आहे. यामुळे अक्षर दासोह योजनेतून आहार देणे शाळा प्रशासनाला अवघड जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारकडून आहाराचे मोजमाप ठरलेले आहे. भाजीपाला, सांबार पावडर, मीठ यासाठी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 1 रुपये 93 पैसे तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 रुपये 89 पैसे निधी दिला जातो. सध्या शाळांमध्ये अंडी वितरण सुरू आहे. कुपोषित मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी अंडी व चिक्की वितरण केले जात आहे. सध्या अंड्यांचे दर वाढले असून 7 ते 7.50 रुपये प्रतिनग विक्री होत आहे. परंतु, सरकारकडून 5 रुपये प्रतिदराने निधी दिला जात आहे. 1 रुपया वाहतूक खर्च व उकडण्यासाठी दिले जातात. सरकारकडून येणारे अनुदान व प्रत्यक्ष खर्च यामध्ये तफावत असल्याने मुख्याध्यापकांना खर्च सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये टोमॅटोचे दर शंभर रुपयांवर पोहोचले. त्यामुळे मध्यान्ह आहारामध्ये टोमॅटोचा वापर अशक्य झाला आहे. यातच इतर भाज्यांचेही दर वाढले असल्याने ज्या भाज्यांचे दर कमी आहेत, अशाच भाज्या वापराव्या लागत आहेत.
अधिक निधी उपलब्ध झाल्यास शाळांना वितरित होणार
सरकारकडून दिले जाणारे अनुदान हे बाजारपेठेच्या दरावर अवलंबून नसते. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात झालेल्या वाढीचा मध्यान्ह आहारावर परिणाम होत आहे. सरकारकडून अधिक निधी उपलब्ध झाल्यास तो शाळांना वितरित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
– लक्ष्मणराव यक्कुंडी (अक्षर दासोह योजना अधिकारी)









