विक्रीत दुपटीने घट : व्यावसायिकांना फटका
बेळगाव : मार्गशीर्षला प्रारंभ झाल्याने मांसाहार विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: मटण, चिकन, मासे, अंडी खरेदीत दुपटीने घट झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना मार्गशीर्षचा फटका बसू लागला आहे. मार्गशीर्ष महिन्यात महिलांकडून दर गुरुवारी व्रत केले जाते. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे मांसाहार खवय्यांच्या संख्येत घट होते. परिणामी मांसाहार विक्रीत घट झाली आहे. मटण, चिकन, बांगडे आणि अंड्यांची मागणी थंडावली आहे. मात्र, मटण 680 वरून 700 रुपये किलो तर चिकन 150 रुपयांवरून 190 रुपये किलो झाले आहे. तर अंडी शेकडा 600 रुपयांनी विक्री होऊ लागली आहेत. 13 डिसेंबरपासून मांसाहारच्या मागणीत घट झाली आहे. मात्र, मटण आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे. विशेषत: दीडशे रुपये किलो असणारे चिकन 190 रुपयांवर पोहोचले आहे. थंडीत विशेषत: चिकन आणि अंड्यांना पसंती दिली जाते. मात्र सध्या मार्गशीर्ष सुरू असल्याने अनेकांची निराशा झाली आहे. मात्र, 31 डिसेंबर तोंडावर आल्याने मटण व चिकनच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे 31 डिसेंबरकडे लक्ष लागले आहे.
31 डिसेंबर रोजी मागणीत वाढ होण्याची शक्यता
मार्गशीर्षमुळे मांसाहाराची मागणी 50 टक्के कमी झाली आहे. मटण, चिकन आणि अंड्यांच्या खरेदीत देखील घट झाली आहे. 31 डिसेंबर रोजी मागणीत वाढ होईल. थंडी सुरू असली तरी मार्गशीर्षचा फटका बसू लागला आहे.
– उदय घोडके (बेळगाव मटण शॉप असोसिएशन अध्यक्ष)









