हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे निवृत्त जनरल मॅनेजर भरत शिरोडकर यांचे प्रतिपादन
ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्रात एकमेव भागशाळा असलेल्या देवसू माध्यमिक विद्यालयाने दहावी परीक्षेत गेल्या २२ वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. प्रशालेची ही शैक्षणिक कामगिरी कौतुकास्पद असुन या शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे निवृत्त जनरल मॅनेजर भरत शिरोडकर यांनी दिली.
गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवसू माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात भरत शिरोडकर बोलत होते. यावेळी गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. लवू सावंत, सचिव मोहन गवस, उपाध्यक्ष प्रमोद परब, विठ्ठल सावंत, अविनाश सावंत, ओवळीये माजी उपसरपंच सागर सावंत, पारपोली माजी उपसरपंच अरुण गावकर राजेश परब, पत्रकार त्रिविक्रम सावंत, शाळेचे मुख्याध्यापक एस के डांगी, शिक्षक आर डी पाटील, दयानंद मोरे, विजय ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ लवू सावंत यांनी ही शाळा देवसू, दाणोली, पारपोली या तीन गावचे भूषण असून या शाळेचा शैक्षणिक विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी भरत शिरोडकर यांनी कै वसंत शिरोडकर यांच्या समरणार्थ यावर्षी शाळेतून दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक कु शर्वरी श्रीकृष्ण आरोंदेकर, द्वितीय क्रमांक कु नुतन सुधीर नाईक, तृतीय क्रमांक कु दीपेश विष्णू गावकर या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे ११००० रुपयांचे पारितोषिक दिले. यावेळी भरत शिरोडकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्राणायाम व योगासने याबाबत प्रत्येक शनिवारी मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर केले.