ग्रामविकास विभागाच्या सुगम, दुर्गमच्या निकषाला तुडवले पायदळी
विशाल कदम/ सातारा
बहुतांशी प्राथमिक शिक्षकांना दुर्गम भागातल्या शाळांवर काम करायला नको वाटते. शहराजवळची शाळा हवी असते. दरवर्षी होणाऱया बदलीचा काही शिक्षक खुष्कीच्या मार्गाचा वापर करुन लाभ घेत असतात. गावोगावी रस्ते झाले आहेत. मोबाईल सुविधा झाल्या आहेत. अशा विकसनशील गावांचा समावेश सुगम म्हणून नेत्यांच्याकडे पावशेर वापरुन काही शिक्षकांनी केल्याचेही उघडकीस येत आहे. तर यावर्षी अजूनही बदल्यांची प्रक्रियाच झाली नसल्याने बदल्यांच्या प्रतिक्षेमुळे शिक्षणाचा सगळा खेळखंडोबा झाला आहे. ग्रामविकास विभागाच्या अद्यादेशच पायदळी तुडवून पळवाटा शोधत दुर्गमच्या गावे सुगम आणि सुगम गावे दुर्गम बनवली गेली आहे.
सातारा जिह्यात सुमारे 8 हजार जिल्हा परिषदेचे शिक्षक कार्यरत आहेत. आजही ग्रामीण भागात खाजगी शाळापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांवरच मदार आहे. जिल्हा परिषदेचा शाळांचा पट रोडवत असला तरीही सर्वसामान्यांच्या पालकांना जिल्हा परिषदेची शाळा महत्वाची वाटते. काही शिक्षक मिळेल तेथे नोकरी करतात. चांगले शिक्षणाचे काम करतात. परंतु बहुतांशी शिक्षक हे आपली बदली ही गावाच्या जवळची, तालुक्यातील, शहराजवळची शाळा मिळेल कशी यासाठी प्रयत्न करत असतात. मग त्यात नेत्यांपासून अधिकाऱयांच्या पुढे हुजरेगिरी करत असतात. दरवर्षी बदली प्रक्रियेत आपल्यालाच कशी जवळची सोयीची शाळा भेटेल यासाठी काहीही करुन प्रयत्न करत असतात. जिह्यात कोरोना काळात बदल्या झाल्या नव्हत्या. यावर्षी बदल्या होतील अशी आशा होती. परंतु तीही आशा मावळली असून ऑगस्ट महिना संपत आला तरीही जिल्हा अंतर्गत बदल्यांना मुहूर्त लागेना झाला आहे.
ग्रामविकास विभागाकडून बदल्यांबाबात वारंवार सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरु आहे. परंतु नेमका मुहूर्तच मिळेना. ग्रामविकास विभागाकडून सुगम, दुर्गम शाळा ठरवण्यासाठी निकष पाठवले होते. आपली शाळा दुर्गम बसवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी शाळांच्या शिक्षकांनी केली होती. गावात डांबर असलेली गावे दुर्गम शिक्षकांनी नेत्यांकडून अधिकाऱयांवर पावशेर आणून करुन घेतली. तर काही शिक्षकांनी त्या शिक्षकांची जिरवण्यासाठी दुर्गमची शाळा सुगम केली. असे जिह्यात प्रकार घडले आहेत. त्यातच जिल्हातंर्गत बदल्या या ऑनलाईन होणार असे सांगण्यात येत असल्याने बदलीपात्र शिक्षक हे शाळेत मुलांना शिकवण्यापेक्षा आपलीच बदली कुठल्या शाळेवर होईल याच्याच टेन्शनमध्ये असल्याने माहिती भरण्यापासून अर्ज करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिक्षणाचा सगळाच जिह्यात खेळखंडोबा झाला आहे.
शिक्षण विभागातच नाही ताळमेळ
विद्यमान शिक्षणाधिकारी शबनम मुजावर या सातारा जिह्यातील असल्याने आणि त्यांनी जिह्यात शिक्षक या पदापासून ते गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी या पदावर काम केल्याने त्यांना सर्व शिक्षकांच्या खाचाखुणा माहिती आहेत. त्यामुळे कोणालाही त्या समोर तोंडावर नाराज करत नाहीत परंतु त्यांना जे करायचे असते ते करतात, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे शिक्षण विभागात ताळमेळ नसून सातारा तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱयांच्याबाबतीत अनेक तक्रारी असून त्यांच्याकडे केवळ दोनच कर्मचारी अशीच जिह्याची अवस्था असल्याचे चित्र आहे.
आतंरजिल्हावाल्यांना कार्यमुक्ती कधी? राज्यभरातून येणाऱया आंतरजिल्हा बदलीहून स्वजिह्यात येण्यासाठी अनेक शिक्षक प्रयत्न करत असतात. परंतु 2019-20 मध्ये सुमारे दीडशे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिह्यात आले. त्यांना अजूनही कार्यमुक्ती त्या जिह्याने दिली नाही. असे असताना नव्याने 66 जणांची त्यात भर पडली आहे. तर जिह्याने त्यावेळी बाहेर जाणाऱयांना कार्यमुक्त केले होते. आता शिक्षकांची नव्याने भरतीही नसल्याने सुमारे 1027 पदे रिक्त आहेत








