अभाविपतर्फे मागणी : आरपीडी चौकापासून गोवावेस सर्कलपर्यंत मोर्चा
बेळगाव : चेक बाऊन्स फसवणूक प्रकरणात दोषी ठरलेले राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली. आरपीडी चौकापासून गोवावेस सर्कलपर्यंत मोर्चा काढून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शिक्षणमंत्र्यांनी एका व्यवहारादरम्यान धनादेश दिला होता. परंतु चेक बाऊन्स झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. एका जबाबदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर असे गुन्हे दाखल होतील तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली. यावेळी शहर सचिव रोहित अलगुंटे, रोहित उमनाबादीमठ, अप्पण्णा हडपद, मंजू हंचिनमनी, मनोज पाटील, देवराज, मल्लू पुजारी, दर्शन हेगडे यासह इतर उपस्थित होते.









