‘तरुण भारत’ने आवाज उठविताच शाळांना पिकलेल्या केळ्यांचे वितरण
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना कच्च्या केळ्यांचा पुरवठा करून त्यांच्या आरोग्याशी शिक्षण विभागाचा खेळ सुरू असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच संबंधित विभागाला जाग आली. मागील दोन दिवसांत शहरासह उपनगरामधील शाळांमध्ये पिकलेल्या केळ्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे पालक व शिक्षकांमधून ‘तरुण भारत’चे आभार मानण्यात आले. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना अंडी, तसेच केळी वितरण केले जाते. यापूर्वी चिक्कीचे वितरण करण्यात येत होते. परंतु सध्या ते थांबविण्यात आल्याने केवळ अंडी व केळी दिली जात आहेत. बेळगाव शहर व उपनगरात मागील काही दिवसांपासून कच्ची केळी वितरीत केली जात होती. लहान विद्यार्थी कच्ची केळी सेवन करून आजारी पडत असल्याची तक्रार काही पालकांनी केल्याने या समस्येला वाचा फुटली.
सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी एका सरकारी शाळेमध्ये जाऊन केळ्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांना कच्च्या केळ्यांचे विद्यार्थ्यांना वितरण केले जात असल्याचे निदर्शनास आले. ‘तरुण भारत’ने यावर प्रकाश टाकल्याने शिक्षण विभागाला जाग आली. सोमवारपासून कंत्राटदारांकडून पिकलेल्या केळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. कच्ची व रासायनिक पद्धतीने पिकविलेली केळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानीकारक असल्याबाबत अधिकाऱ्यांनी कान टोचताच पिकलेली केळी देण्यात येत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे.









