मडगाव : वेरोडो-कुंकळळी येथील सेंट अथँनी हायस्कूलच्या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनी स्वरा फातर्पेकर हिला तिच्या सहकारी वर्गमित्रांकडून मारहाण झाली. त्यात ही विद्यार्थिनी जबर जखमी होऊन गोमेकॉत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याप्रकरणाची शिक्षण खात्याने स्वेच्छा दखल घेतली असून हायस्कूलच्या व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे. स्वरा फातर्पेकर हिला मारहाण झाल्याची व तिची प्रकृती बिघडल्याची कुणीच शिक्षण खात्याकडे तक्रार केलेली नाही. मात्र, शिक्षण खात्याने वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे स्वेच्छा दखल घेतली आहे. शिक्षण खात्याने आपले अधिकारी पाठवून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार केला असून हा अहवाल मंगळवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी आपल्याला मिळाला असल्याची माहिती झिंगडे यांनी दिली. शिक्षण संचालकांनी या प्रकरणाची कल्पना सरकारला दिलेली आहे.
आज कारणे दाखवा नोटिस
शिक्षण संचालकांना मंगळवारी अहवाल मिळाला. काल बुधवारी गांधी जयंती निमित्त सुट्टी असल्याने हायस्कूल व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावणे शक्य झाले नाही. मात्र, आज गुरूवारी सेंट अँथनी हायस्कूलच्या व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे झिंगडे यांनी सांगितले. हे हायस्कूल खासगी असल्याने शिक्षण खाते थेट कारवाई करू शकत नाही. या प्रकरणात जर शिक्षकांचा निष्काळजीपणा असेल तर हायस्कूले व्यवस्थापन कारवाई करू शकते. या मारहाण प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून ही सीसीटीव्ही फुटेज पाहून हायस्कूल व्यवस्थापन योग्य ती कारवाई करणार असल्याचे झिंगडे यांनी सांगितले.
स्वराला न्याय देण्यासाठी आर्त हाक
बाळळी-केपे येथील रहिवासी असलेल्या स्वरा फातर्पेकर हिला शाळेत तिच्या सहकारी वर्गमित्राकडून मारहाण झाली. संबंधित वर्ग शिक्षिकेला परिस्थितीची माहिती देण्यात आली, परंतु तिने परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. पुढे प्रकरण वाढत गेले आणि शाळेकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही. शाळा प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे मुलीची प्रकृती खालावली असून तिला न्याय देण्याची आर्त हाक तिच्या पालकांनी मारलेली आहे. स्वरा फातर्पेकर हिच्यावर गोमेकॉत सुरू असलेल्या उपचाराचा व्हिडियो व्हायरल झालेला असून त्यात न्याय देण्यासाठी आर्त हाक मारली आहे.
काँग्रेस पक्षाचे मौन कशासाठी
भाजप सरकारच्या विरोधात आघाडी उघडलेल्या काँग्रेस पक्षाने या संपूर्ण प्रकरणात मौन बाळगले आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या मतदारसंघात हे स्कूल येत असून जी विद्यार्थिनी जखमी झालेली आहे ती केपे मतदारसंघातील असून या मतदारसंघाचे आमदार अॅल्टन डिकॉस्ता यांनीही मौन पाळले आहे. या दोघांचे मौन कशासाठी असा सवाल उपस्थित झालेला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण युरी व अॅल्टन यांच्याशी चर्चा करतो एवढेच ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस पक्षाची भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे.









