थेट निलंबन करण्याची कारवाई : गणिताच्या पेपरवेळी परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट
बेळगाव : दहावीच्या बोर्ड परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणाऱ्या तसेच त्यांना मदत करणाऱ्या शिक्षकांना शिक्षण विभागाने दणका दिला आहे. आतापर्यंत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 11 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याव्यतिरिक्त अन्य काही जणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एसएसएलसी परीक्षेमध्ये कॉपीचा सुळसुळाट सुरू असून, याला पर्यवेक्षक म्हणून सेवा बजाविणारे शिक्षकच मदत करत असल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाच्या अप्पर आयुक्त जयश्री शिंत्री यांनी कॉपीला आळा घालण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी त्याचबरोबर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. सोमवार दि. 3 रोजी झालेल्या गणिताच्या पेपरवेळी बेळगाव तालुक्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे उघड झाले होते. कर्तव्यात कसूर ठेवल्याने आतापर्यंत 11 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक परीक्षा केंद्रात कडक बंदोबस्तात परीक्षा घेतली जात आहे. बागेवाडी येथे झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात 7 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर आणखी 4 शिक्षकांवर कारवाई झाली. यासह काही हायस्कूलच्या शिक्षकांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मराठी भागातील शाळांचा व त्यांच्या शिक्षकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.









