सरकारी शाळांमधील पिण्याच्या पाण्याची मागवण्यात आली माहिती, शहरातील शाळांनी दिला अहवाल
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावामध्ये सरकारी शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष घालण्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी झाला होता. असे प्रकार जिल्ह्यात इतरत्र होऊ नयेत, यासाठी शालेय शिक्षण विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्रत्येक शाळेतील पिण्याच्या पाण्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातून शालेय शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला गावातून हाकलण्यासाठी सरकारी शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष घातल्याचा प्रकार हुलीकट्टी गावामध्ये झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने याची दखल जिल्हा पंचायत तसेच सार्वजनिक शिक्षण विभागाने घेतली आहे. त्याचबरोबर आठ दिवसांपूर्वी बेळगाव तालुक्यातील मार्कंडेयनगर येथील सरकारी शाळेतील जेवणातून विषबाधा झाल्याने विद्यार्थी अत्यवस्थ झाले होते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व शाळा मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. मंगळवारी बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शाळांच्या मुख्याध्यापकांना माहिती जमा करण्यास सांगण्यात आली होती. शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी शाळेच्या अंतर्गत भागात आहे की, बाहेरच्या भागात? पाण्याच्या टाकीची स्वच्छता किती दिवसांनी केले जाते? पाण्याची टाकी स्वयंपाक खोलीमध्ये आहे का? यासह इतर प्रश्न मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. त्याचबरोबर शाळांना भेटी देऊन तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करणार
दक्षिण कर्नाटकातील एका शाळा परिसरातील नारळाचे झाड वीजवाहिन्यांवर कोसळले व वीजवाहिनी थेट शाळेच्यासमोर पडल्याने यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी शाळांमधील धोकादायक झाडे, वीजवाहिन्या, शाळेतील जुने वायरिंग याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून जमा केली जात आहे. धोकादायक ठिकाणचे दुरुस्तीचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.









