दिवसाला 10 टक्के परताव्याचे आमिष : शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, खात्यावरील संपूर्ण रकमेवर डल्ला : घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च खबरदारी घेण्याची गरज
बेळगाव : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार थांबता थांबेनात. गुन्हेगार रोज नवनवीन क्लृप्त्या लढवून ग्राहकांच्या बँक खात्याला खिंडार पाडवत आहेत. केवळ महिनाभरात बेळगाव शहर व जिल्ह्यातील डॉक्टर, उद्योजक, खासगी कंपनीतील कर्मचारी आदींना सव्वादोन कोटी रुपयांहून अधिक रुपयांना गंडविण्यात आले आहे. ‘शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा, एका दिवसात 10 टक्के नफा मिळवा’, असे सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फशी पडणारे सगळेच सुशिक्षित आहेत. त्यापैकी कोणीच निरक्षर नाहीत. तरीही रोज 10 टक्के परतावा मिळविण्याच्या आमिषाला बळी पडून आपल्या उभ्या आयुष्यात कमावलेली पुंजी गुन्हेगारांच्या हवाली केली जात आहे. बेळगाव शहर व जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल झाले आहेत. सायबर गुन्हेगारांचे मूळ शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. बेळगावकरांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे तर दूरच, त्यांचे बँक खाते गोठविणेही कठीण झाले आहे. कारण सायबर पोलिसांच्या भीतीने गुन्हेगारांनी पूर्णपणे आपल्या खात्यातील रक्कम रिकामी केली आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांना न्याय देणे पोलिसांना अवघड जात आहे.
खबरदारी बाळगली नाही तर फसवणूक निश्चित
गेल्या मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी वाढत्या सायबर गुन्हेगारीविषयी माहिती देत खबरदारी बाळगली नाही तर फसवणूक निश्चित आहे, असा इशारा दिला होता. केवळ दोन महिन्यांत बेळगाव शहर व जिल्ह्यात घडलेल्या घटना लक्षात घेता रोज 10 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून गुन्हेगारांनी बेळगाव जिल्ह्यातील उद्योजक, खासगी कंपनीतील कर्मचारी, डॉक्टर, अभियंते आदींना सुमारे 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातला आहे.
आम्ही सांगतो तशी गुंतवणूक करा, भरपूर नफा मिळवा
बहुतेक प्रकरणात फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून सावजांचा शोध घेण्यात आला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी खडकलाट येथील शिवराज केरगुंटे हे फेसबुकवर व्यस्त असताना त्यांना एक मेसेज आला. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा, असा तो मेसेज होता. त्यामध्ये भरमसाट आमिषे दाखविलेली होती. एका दिवसात 10 टक्के नफा कुठेच मिळत नाही. आम्ही सांगतो तशी गुंतवणूक करा, भरपूर नफा मिळवा, असा प्रचार सायबर गुन्हेगारांनी त्या पोस्टच्या माध्यमातून केला होता.
गुन्हेगारांच्या भूलथापांवर विश्वास
गुन्हेगारांच्या भूलथापांवर विश्वास ठेवून शिवराज यांनी त्या लिंकवर क्लिक केले. त्यावेळी सहजपणे ते सायबर गुन्हेगारांनी विणलेल्या जाळ्यात अडकत गेले. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 75 लाख 20 हजार रुपये गुन्हेगारांच्या सांगण्यावरून गुंतविले आहेत. दोन वेळा खात्री करून घेण्यासाठी त्यांनी 1 लाख 97 हजार 50 रुपये काढले. ही रक्कम काढल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार नाही तर खरोखरच व्यवहार योग्य आहे, याची त्यांना खात्री पटली. पुढे ते अडकत गेले. त्यांना एकूण 73 लाख 22 हजार 950 रुपयांचा गंडा बसला आहे.
सावजाला ठकविल्यानंतर गुन्हेगारांचे मोबाईल बंद
गोकाक येथील व्यावसायिक बाबुराव कलाल यांना 28 डिसेंबर 2023 ते 16 जानेवारी 2024 पर्यंत 27 लाख 50 हजार 87 रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. तर आणखी एका घटनेत केरुर, ता. चिकोडी येथील चिदानंद नेजकर (वय 36) यांना 58 लाख 34 हजार 720 रुपयांना ठकविण्यात आले आहे. या सर्व घटना शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा, असा सल्ला देत झाल्या आहेत. सावजाला ठकविल्यानंतर सायबर गुन्हेगारांचे मोबाईल बंद झाले आहेत. बँक खात्यातील व्यवहारही ठप्प झाले आहेत. एखाद्या घटनेनंतर सायबर गुन्हेगारांची बँक खाती गोठवून फशी पडलेल्या सावजाला रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. एफआयआर दाखल झाल्यानंतर सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी गुन्हेगारांची बँक खाती पूर्णपणे रिकामी आहेत. त्यामुळे रक्कम परत मिळण्याची आशा धूसर झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारल्यानंतर लवकरात लवकर जर कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाली तर गुन्हेगारांचे बँक खाते गोठवून थोडी तरी रक्कम सावजाला परत मिळवून देणे शक्य आहे. मात्र, या बहुतेक प्रकरणात पंधरा दिवस, एक महिन्यानंतरच एफआयआर दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात अंजनेयनगर येथील एका डॉक्टरांशी संपर्क साधून शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा, झटपट नफा मिळवा, असे आमिष दाखवत त्यांना 58 लाख रुपयांना गंडविण्यात आले होते. एकापाठोपाठ एक असे फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, असे सांगत झारखंडमधील सायबर गुन्हेगार पूर्वी केवळ बँक खात्यातील 50 हजार ते एक-दोन लाखांपर्यंतची रक्कम काढत होते. आता तर सावजाला भरपूर परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुरते नागवले जात आहे.
आयुष्याची कमाई सायबर गुन्हेगारांच्या घशात
जिल्हा व शहर सीईएन पोलिसांकडून अशा घटना टाळण्यासाठी सातत्याने जनजागृती केली जाते. शाळा-कॉलेजना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे उपक्रमही पोलिसांनी हाती घेतले आहेत. तरीही फसवणुकीचे प्रकार काही थांबेनात. 50 लाख, 58 लाख, 75 लाख गमावणाऱ्यांमध्ये निरक्षर असे कोणीच नाही. हे सगळे डॉक्टर, उद्योजक, अभियंते, खासगी कंपनीतील अधिकारी आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांवर विश्वास ठेवून संपूर्ण आयुष्याची कमाई त्यांनी सायबर गुन्हेगारांच्या घशात घातली आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.









