कार्यवाही स्थगित करण्यास दिली सहमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे माजी आमदार सत्येंद्र जैन यांच्या विरोधातील पीएमएलए प्रकरणात कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाही स्थगित करण्याच्या याचिकेला विरोध केल्यावर ईडीने आता यू-टर्न घेतला आहे. जैन यांच्या विनंतीशी सहमत असल्याचे ईडीने दिल्ली उच्च न्यायालयाला कळविले आहे.
जैन यांनी राउज अॅव्हेन्यू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली हाती. आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यात सत्र न्यायालयाची कार्यवाही स्थगित करण्यात यावी. या प्रकरणी तपास जारी आहे, गुन्ह्याच्या उत्पन्नावर वेगवेगळे मत राहिले असून सीबीआयने माझ्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याच्या आरोपांची पुढील चौकशी सुरू केली असल्याचे जैन यांनी याचिकेत म्हटले होते. तर ईडीने त्यावेळी याचिकेला विरोध करत जैन यांची याचिका कायदेशीर प्रक्रियेचे घोर उल्लंघन असल्याचा युक्तिवाद केला होता. विशेष न्यायाधीशांनी 4 सप्टेंबर रोजी जैन यांची याचिका फेटाळली होती.
यानंतर जैन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. सीबीआयकडून या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासह अनेक घडामोडी घडल्या आहेत. सीबीआय तपासानंतर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा आकडा 1.47 कोटी रुपयांवरून वाढत 3.95 कोटी रुपये झाला आहे. तर ईडीने 1.47 कोटी रुपयांच्या गुन्ह्यावर तक्रार नोंदविली असल्याचा युक्तिवाद जैन यांचे वकील जोहेब हुसैन यांनी केला.









