9 ऑक्टोबर रोजी हजर रहावे लागणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना समन्स जारी केला आहे. ईडीने अभिषेक बॅनर्जी यांना नव्या समन्समध्ये 9 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तर अभिषेक यांच्या पत्नी रुजिरा यांना चौकशीसाठी 11 ऑक्टोबर रोजी बोलाविण्यात आले आहे.
तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी यांना यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीकरता 3 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु अभिषेक मंगळवारी दिल्लीत असल्याने ते कोलकात्यातील ईडीच्या कार्यालयात उपस्थित झाले नव्हते.
पश्चिम बंगालमध्ये 2014 साली शिक्षक भरती घोटाळा झाला होता. घोटाळ्यावेळी पार्थ चटर्जी हे राज्याचे शिक्षणमंत्री होते. या घोटाळ्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच गुणवत्ता यादीत नाव नसतानाही काही जणांना नोकरी मिळाली होती.









