खनिज घोटाळा भोवण्याची चिन्हे, बेहिशेबी उत्पन्नाचाही मुद्दा
रांची / वृत्तसंस्था
झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठविले आहे. राज्यातील अवैध खाण प्रकरणी, तसेच उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक प्रमाणात संपत्ती जमा केल्याच्या प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. आज गुरुवारी त्यांना उपस्थित व्हायचे आहे.
सोरेन यांचे सहकारी पंकज मिश्रा यांना या घोटाळय़ाप्रकरणी आधीच अटक करण्यात आली आहे. साहेबगंज येथील मिश्रा यांच्या निवासस्थानी घातलेल्या धाडीत ईडीच्या हाती एक लिफाफा लागला होता. या लिफाफ्यात हेमंत सोरेन यांच्या बँक खात्याचे एक चेकबुक सापडले होते. या चेकबुकमधील दोघ चेक्सवर स्वाक्षऱयाही आढळून आल्या आहेत. याशिवाय सोरेन यांचे अन्य सहकारी प्रेम प्रकाश यांच्या घरातून दोन एके 47 मशिन गन्स आणि 60 गोळय़ाही जप्त करण्यात आल्या होत्या. या गन्स मुख्यमंत्र्यांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणाऱया सुरक्षा सैनिकांच्या नावे वितरीत करण्यात आल्या होत्या. पंकज मिश्रा याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या नावे सरकारी अधिकाऱयांना धमक्या दिल्याचाही आरोप असून याचे भक्कम पुरावे असल्याचे प्रतिपादनही ईडीकडून करण्यात आले आहे.
11.88 कोटी रुपये जप्त
गेल्या वर्षी ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात तक्रार सादर केली होती. मुख्यमंत्री आणि त्यांच्या काही सहकाऱयांनी झारखंडमधील खनीज संपत्तीच्या अवैध उत्खननातून मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप ईडीने केला होता. मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज म़िश्रा यांच्या यांच्या 37 बँक खात्यांमधील 11 कोटी 88 लाख रुपयांची रक्कम ईडीने गोठविली आहे. त्याचप्रमाणे 5 कोटी 34 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. हे धन अवैध खनिज प्रकरणातून मिळविलेले आहे, असा ईडीचा आरोप आहे.
तीन सहकाऱयांना अटक
आतापर्यंत ईडीने सोरेन यांच्या तीन सहकाऱयांना अटक केली आहे. 19 जुलै 2022 या दिवशी पंकज मिश्रा याला, 4 ऑगस्ट 2022 या दिवशी बच्चू यादव याला आणि 25 ऑगस्ट या दिवशी प्रेम प्रकाश याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या तपासाच्या वेळी मिळलेल्या माहितीच्या आधारावर ईडीने आणखी धाडी टाकून कागदपत्रे आणि संपत्ती जप्त केली आहे.









