मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी पाटण्यात हजर राहण्याची सूचना
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांना शुक्रवारी समन्स बजावले आहे. ईडीने लालूप्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना या महिन्याच्या अखेरीस मनी लाँड्रिंगच्या तपासात पाटणा कार्यालयात हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. लालूप्रसाद यादव यांना 29 जानेवारीला, तर तेजस्वी यादव यांना 30 जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी पोहोचून सदर नोटीस पोहोचवली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांनी लालूप्रसाद यादव यांच्या मुसक्मया आवळण्यास सुऊवात केली आहे. शुक्रवारी एका मोठ्या घडामोडीत अंमलबजावणी संचालनालयाने लालू कुटुंबीयांना नोटीस जारी केली आहे. त्यानुसार लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना पाटणा येथील बँक रोडवर असलेल्या ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी यापूर्वी जारी केलेल्या समन्सवर दोघेही हजर झाले नव्हते.
नोटीस बजावण्यात आलेला कथित घोटाळा लालूप्रसाद यादव पहिल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारमध्ये रेल्वेमंत्री असतानाच्या काळातील आहे. ईडीने नोकरीसाठी जमीन घोटाळ्याप्रकरणी तेजस्वी यादव आणि लालूप्रसाद यादव यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. ईडीने नोकरीसाठी जमीन घोटाळ्याशी संबंधित सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात लालू यादव यांनी 2004-09 या कालावधीत भारतीय रेल्वेमध्ये ‘ड’ वर्गातील पदांची भरती करताना लाच म्हणून जमीन हस्तांतरित करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले आहे.