जमीन घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी : 14 ऑगस्टला हजर राहण्याची सूचना
वृत्तसंस्था/ रांची
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मंगळवारी समन्स बजावला आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सोरेन यांच्यावर सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे.
सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांना ईडीने यापूर्वीच याप्रकरणी अटक केली आहे. आता या प्रकरणी सोरेन यांना 14 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना याच प्रकरणी 18 नोव्हेंबर 2022 रोजी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते आणि जवळपास 10 तासांपर्यंत चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यात रांचीचे माजी उपायुक्त छवि रंजन, कोलकात्यातील व्यावसायिक अमित अग्रवाल, व्यावसायिक विष्णू अग्रवाल यांचाही समावेश आहे.
रांचीमध्ये सैन्याच्या नियंत्रणाखालील जमिनीप्रकरणी कर आयुक्तांनी सरकारला अहवाल सोपविला होता. बनावट नावं अन् पत्त्याच्या आधारावर सैन्याच्या जमिनीवर अवैध कब्जा करण्यात आल्याचे अहवालात म्हटले गेले होते. रांची महापालिकेने याप्रकरणी तक्रार केली होती. नोव्हेंबर महिन्यात संशयितांच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते, ज्यात अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज हस्तगत झाले होते.
8 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री सोरेन यांचे प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. यात ईडीला मुख्यमंत्री सोरेन यांच्या बँक खात्याशी निगडित एक चेकबुक सापडले होते. याचनंतर सोरेन यांचे नाव या प्रकरणात जोडले गेले होते.









