हरियाणात काँग्रेस आमदार अडचणीत
रोहतक : हरियाणाच्या महेंद्रगढचे काँग्रेस आमदार राव दान सिंह यांच्या निवासस्थानी ईडीने गुरुवारी पहाटे छापे टाकले आहेत. ईडीचे पथक राव दान सिंह यांच्या निवास्थानी पोहोचले होते. दान सिंह यांनी भिवानी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविली होती. महेंद्रगढचे चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेले राव दान सिंह यांच्या निवासस्थानी पहाटे 4 वाजताच ईडीचे पथक पोहोचले. ईडीच्या कारवाईदरम्यान कुठल्याही बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली. निवासस्थानाच्या चहुबाजूला पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
ईडीच्या पथकाने राव दान सिंह यांच्या सिगडी गावातील फार्महाउस तसेच महेंद्रगढ येथील निवासस्थानी झडती चालविली आहे. राव दान सिंह हे हरियाणातील शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जातात. तसेच ते महेंद्रगढचे आमदार आहेत. बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महेंद्रगढ येथे भाजपसाठी जाहीरसभा घेतली होती. तसेच राव दान सिंह काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे निकटवर्तीय आहेत. राव दान सिंह यांनी भिवानी येथून लोकसभा निवडणूक लढविली होती. राव दान सिंह यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तर दुसरीकडे काँग्रेसने किरण चौधरी यांच्या कन्या श्रुती चौधरी यांना उमेदवारी नाकारली होती. यामुळे हु•ा आणि चौधरी गट आमने-सामने आले होते. यानंतर किरण चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.









