शहरात जंबो कोविड सेंटर्स चालवण्याच्या कंत्राटामध्ये अर्थिक अनियमितता आल्याचा आरोप करून मनी लॉंडरिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबई आणि लगतच्या भागात 15 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंबई परिसरात 14 आणि शहराबाहेर एक परिसरात या धाडी टाकण्यात आल्य़ा. यामध्ये आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे यांचे जवळचे सुजित पाटकर यांच्या घरांवर आणि कार्यालय़ावर ही कारवाई करण्यात आली.
या अगोदर जानेवारीमध्ये ईडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना समन्स बजावून त्यांचा जबाब नोंदवला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दोन जंबो केंद्रे स्थापन करण्यासाठी करार केलेल्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांविरुद्धची ही चौकशी होती. आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरवरून ईडीने ही चौकशी केली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जवळचे असलेले सुजित पाटकर हे लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांपैकी एक असल्याचा आरोप केला गेला आहे.








