वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाखान यांच्या घरांवर ईडीने टाकलेल्या धाडीत महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई होत आहे. खान यांच्या ओखला येथील निवासस्थानावर प्रथम धाड टाकण्यात आली.
खान यांच्यावर दिल्लीच्या भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरणाने तक्रार सादर केली आहे. तसेच सीबीआयनेही तक्रार सादर केली आहे. दिल्ली वक्फ मंडळाच्या नियुक्त्यांमध्ये खान यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या नियुक्त्या खान यांच्या पुढाकाराने बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
ईडीकडून दखल
दिल्ली भ्रष्टाचार विरोधी प्राधिकरण आणि सीबीआय यांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) या धाडी घातल्याची माहिती देण्यात आली आहे. खान हे दिल्ली राज्यातील सत्ताधारी असणाऱ्या आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांना याच आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर त्यांचा जमीन दिल्लीच्या रोझ अॅव्हेन्यू न्यायालयाने मान्य केला होता.
अधिकाराचा गैरवापर
अमानतुल्ला खान हे दिल्लीच्या वक्फ मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करुन 12 जणांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या सरकारचे कायदे आणि नियम धाब्यावर बसवून केल्या गेल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयने आपल्या हाती घेऊन चौकशी चालविली आहे, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. या धाडींचा संबंध आम आदमी पक्षाचेच आणखी एक नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेशी आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे. संजय सिंग सध्या पोलीस कोठडीत आहेत.
तामिळनाडूतही धाडी
मंगळवारी दुपारपासून ईडीने तामिळनाडूतही धाडसत्र सुरु केले आहे. या राज्यातील काही राजकीय नेत्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या द्रमुक सरकारमधील मंत्री सेंथिल बालाजी यांच्याविरोधातही ईडी आणि सीबीआयकडून कारवाई केली जात आहे.









