कामगारमंत्री राजकुमार आनंद यांच्या 12 ठिकाणांची झडती : मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीत गुरुवारी पहाटे ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा छापे टाकत कारवाईचा धडाका लावला. आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासात ईडीचे पथक गुरुवारी सकाळीच राजकुमार आनंद यांच्या सिव्हिल लाईन्समधील निवासस्थानी दाखल झाले होते. ते सध्या राहत असलेल्या निवासस्थानाबरोबरच त्यांच्याशी संबंधित सुमारे 12 ठिकाणी सकाळपासून ईडीचे छापे आणि झडती सुरू होती. राजकुमार आनंद सध्या दिल्ली सरकारमध्ये कामगार मंत्री आहेत. या वर्षाच्या सुऊवातीला मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर कामगार मंत्री राजकुमार आनंद यांना शिक्षण आणि आरोग्य मंत्रालये देण्यात आली होती. नंतर आरोग्य खात्याची जबाबदारी सौरभ भारद्वाज यांच्याकडे आणि शिक्षणाची जबाबदारी आतिशी यांच्याकडे देण्यात आली.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर व्हायचे असताना दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. अबकारी धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गुरुवारी ईडी कार्यालयात न पोहोचता थेट विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याबाहेर गेल्याचे दिसून आले. या प्रचारादरम्यान त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल करत आपल्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचा दावा केला आहे.









