वृत्तसंस्था/ हैदराबाद
ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शुक्रवारी तेलंगणाचे महसूल मंत्री पी. श्रीनिवास रेड्डी आणि अन्य काही जणांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. हैदराबाद समवेत राज्यातील 5 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण महसुलमंत्री श्रीनिवास रेड्डी यांचा पुत्र हर्ष रेड्डीच्या विरोधात डीआरआयकडून करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आले होते. हर्ष रेड्डीवर 5 कोटी रुपयांची सात घड्याळं खरेदी करण्याचा आरोप आहे. 100 कोटी रुपयांच्या हवाला तसेच क्रिप्टो करेन्सी रॅकेटशी या प्रकरणाचा संबंध आहे. याप्रकरणी नवीन कुमार नावाचा इसम ईडीच्या तपासाच्या कक्षेत आहे.
28 मार्च रोजी हैदराबादमध्ये एका कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीला समन्स बजावण्यात आला होता. या कंपनीचे संचालक हर्ष रेड्डी आहेत. हाँगकाँग येथील भारतीय नागरिक मुहम्मद फहरदीन मुबीनकडून चेन्नईमध्ये दोन लक्झरी घड्याळे (पाटेक फिलिप 5740 आणि ब्रेगुएट 2759) जप्त करण्यात आली होती. या घड्याळांची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. पाटेक फिलिपचा भारतात कुणीच वितरक नाही. तर भारतीय बाजारात ब्रेगुएटचा स्टॉक संपलेला होता.
तपासात हर्ष रेड्डीने आलोकम नवीन कुमारद्वारे मुबीनकडून ही घड्याळं खरेदी केल्याचे समोर आले. नवीन कुमारची 12 मार्च रोजी चौकशी करण्यात आली. नवीन हा मुबीन अणि हर्ष यांच्यात मध्यस्थीचे काम करत होता. या व्यवहाराकरता हवाला आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. तर हर्ष रेड्डीने स्वत:वरील आरोप फेटाळले आहेत.









