शाहजहां शेखच्या ठिकाणांवर कारवाई : सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे जवान तैनात
वृत्तसंस्था /संदशखाली
अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे नेत शाहजहां शेखच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. संदेशखालीतील धमाखाली घाटला लागून असलेल्या घरांमध्ये, कार्यालये तसेच विटभट्ट्यांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. जमीन बळकाविल्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या ईसीआयआरप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या पथकासोबत सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शाहजहांवर लैंगिक शोषण आणि जमीन बळकाविण्याचा आरोप आहे. शाहजहांला पश्चिम बंगाल पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मिनाखान येथील एका घरातून अटक केली होती. शाहजहां शेखच्या विरोधात 100 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बलात्कार तसेच लैंगिक शोषणाचा आरोप देखील सामील आहे. 5 जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी उत्तर 24 परगणा येथे शाहजहां तसेच तृणमूल नेते शंकर आध्या यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. शाहजहांने शेकडो समर्थकांसोबत अधिकारी आणि निमलष्करी दलाच्या जवानांना घेरले होते. तसेच त्यांनी ईडीची कारवाई रोखली होती. या घटनेत ईडीचे दोन अधिकारी जखमी झाले होते. शाहजहां आणि त्याचे सहाकरी शिबा प्रसाद हाजरा, उत्तम सरदार आणि इतरांच्या विरोधात संदेशखालीमध्ये महिलांचे लैंगिक शोषण तसेच जमीन बळकाविण्याचा आरोप देखील आहे. शाहजहां सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे.









