कोळसा घोटाळय़ाशी संबंधित नेत्यांवर कारवाई
वृत्तसंस्था / रायपूर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सकाळी छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. यात आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱयांचा समावेश आहे. तपास यंत्रणांनी कोळसा घोटाळय़ात ही कारवाई केली असून 14 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तत्पूर्वीच हे छापे टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. अधिवेशनात व्यत्यय आणण्यासाठी ही छापेमारी सुरू करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
अंमलबजावणी संचालयाने प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष राम गोपाल अग्रवाल, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, प्रदेश प्रवक्ते आरपी सिंह, इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष सनी अग्रवाल आणि विनोद तिवारी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याशी संबंधित रायपूरच्या श्रीरामनगर, डीडी नगर, गीतांजली नगर, मोवा येथे छापे टाकण्यात आले. खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष गिरीश दिवांगण आणि सारंगगडचे आमदार चंद्रदेव राय यांच्या घरांवरही कारवाई करण्यात आली. तसेच भिलाई नगरचे आमदार देवेंद्र यादव आणि त्यांचे भाऊ धर्मेंद्र यादव यांच्यावरही ईडीने छापे टाकले.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी ट्विट करून ईडीच्या छाप्यांची माहिती दिली. ईडीने प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष आणि आमदारांसह अनेक सहकाऱयांच्या घरांवर छापे टाकले आहेत. 4 दिवसांनी रायपूरमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन आहे. अधिवेशनाच्या तयारीत गुंतलेल्या आमच्या साथीदारांना थांबवून आमचे मनोबल मोडले जात असल्याचे बघेल यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांकडून आरोप
पक्षनेत्यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यामुळे काँग्रेस संतप्त झाली आहे. गेल्या 9 वर्षांत ईडीने टाकलेल्या छाप्यांपैकी 95 टक्के छापे हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि बहुतांश काँग्रेस नेत्यांच्या विरोधात आहेत, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. तर, अदानींच्या कारनाम्यांचा खुलासा आणि भारत जोडो यात्रेच्या यशामुळे हताश झालेला भाजप लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. ईडीच्या छाप्याला राजकीय हल्ला असल्याचे सांगत आम्ही अशा दडपशाहीपुढे झुकणार नाही. काँग्रेस पक्षाने कोणतेही मोठे पाऊल उचलले की छापासत्र सुरू होते, असेही ते पुढे म्हणाले.









