विविध राज्यांमध्ये सात ठिकाणी कारवाई
वृत्तसंस्था / चंदीगड
बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजीव रंजन यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. ईडीने जम्मू, वाराणसी, पाटणा आणि गुरुग्रामसह 7 ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईवेळी मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तावेज जप्त केले आहेत. राजीव रंजन यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याचा आरोप आहे. यापूर्वी, सप्टेंबर 2022 मध्येही ईडीने शस्त्र परवाना प्रकरणात राजीव रंजन आणि इतर अधिकाऱ्यांची 4.69 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तेत बँक खाती, भूखंड आणि निवासस्थान यांचा समावेश होता. तपासादरम्यान सदर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे शस्त्र परवाने देण्याच्या बदल्यात पैसे कमावल्याचे आढळून आले होते.
शस्त्र परवाना प्रकरणात सीबीआयच्या चंदीगड विशेष गुन्हे शाखेने कुपवाडा जिह्यातील तत्कालीन उपायुक्त आणि इतरांविरुद्ध कारवाईला मान्यता दिली होती. सरकारी अधिकाऱ्यांवर बंदूक विक्रेते आणि दलालांकडून थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांमध्ये परवाने देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.









