वृत्तसंस्था/ यमुनानगर
हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी खाणव्यावसायिक गुरप्रीत सबरवाल यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. गुरप्रीत सबरवाल हे मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. सबरवाल यांचे नाव दिग्गज खाणव्यावसायिकांमध्ये सामील आहे.
ईडीने अवैध खाणकामाशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांचे सहकारी कुलविंदर सिंह यांना सोमवारी अटक केली होती. त्यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारावर यमुनानगरमधील खाण व्यावसायिकाच्या घरी छापा टाकण्यात आला असल्याचे समजते. तर ईडीने सोनिपत येथील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले होते.
दिलबाग सिंह यांच्या घरी ईडीच्या पथकाने 100 तासांहून अधिक काळापर्यंत मालमत्ता तसेच बँक तपशीलाची पडताळणी केली होती. दिलबाग सिंह यांच्या ठिकाणांवरील छाप्यांदरम्यान ईडीच्या टीमने विदेशी शस्त्रास्त्रs, 300 काडतुसे, 5 कोटी रुपये रोख, 100 हून अधिक मद्याच्या बाटल्या जप्त केल्या होत्या.









