वृत्तसंस्था /चंदीगड
पंजाबमधील काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मंत्री भारत भूषण आशू यांच्या घरावर ईडीने गुरुवारी छापा टाकला आहे. आशू यांच्या लुधियाना येथील घरी ही कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्न आणि पुरवठा विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या घरीही झडती घेतली जात आहे. राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये भारत भूषण हे अन्न आणि पुरवठा मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात धान्य वाहतुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पंजाब सरकाने आशू यांच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदविले आहेत. याचमुळे आशू यांना अनेक महिने तुरुंगातही रहावे लागले आहे. सध्या ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. ईडीने दक्षता विभागाकडून धान्य घोटाळ्याची कागदपत्रे मागविली होती. या कागदपत्रांच्या छाननीनंतर गुरुवारी ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ट्रान्सपोर्टर टेंडर घोटाळ्यात माजी मंत्री भारत भूषण आशू यांच्यासमवेत काही कंत्राटदारांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच आशू यांचा खासगी सचिव मीनू पंकज मल्होत्राही याप्रकरणी संशयित आरोपी आहे.









