ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील 9 बड्या व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीने पहाटेपासून छापेमारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील मनी लाँडरिंगच्या आरोपप्रकरणी ही छापेमारी होत आहे. ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, व्यवसायिक विवेक गव्हाणे आणि सीए जयेश दुधेडीया यांच्या घरी छापेमारी सुरू असून, त्यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात येत आहेत.
पुण्यातल्या गणेश पेठ, प्रभात रोड, सिंहगड रोड, कोंढवा, हडपसर, कोरेगाव पार्क, सलिसबरी पार्क, नाना पेठसह भांडारकर रोड या भागांमध्ये ही कारवाई सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवला आहे. कोणालाही आत सोडण्यात येत नाही. घर आणि कार्यालयातील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय या व्यावसायिकांच्या कुटुंबातील लोकांना कोणालाही फोन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ यांचे या व्यावसायिकांशी नेमके कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याची कागदपत्रे आणि पुरावे मिळू शकतात का? याबाबतची तपासणी ईडीच्या पथकामार्फत सुरू असल्याचे समजते.








