आयएएस अधिकाऱयांसह बेनामी संपत्तीधारक निशाण्यावर
रायपूर / वृत्तसंस्था
छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीने शुक्रवारी पहाटे पुन्हा छापे टाकले. रायपूरमधील अशोका टॉवर, ऐश्वर्या किंगडमसह शंकर नगरमधील आयएएस अंबलगन पी यांच्या घरावर आणि काही बंगल्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. आयएएस अधिकारी अंबलगन यांच्या रायपूर आणि भिलाई येथील घरांचीही तपासणी करण्यात आली. या छाप्यांमध्ये ईडीच्या अधिकाऱयांनी जप्त केलेल्या मालमत्तेविषयीची कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती. या छापासत्रामध्ये बेनामी संपत्ती गोळा करणारे आयएएस अधिकारी आणि राजकारणी रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पी अंबलगन हे सध्या पर्यटन आणि संस्कृती विभागाचे सचिव आहेत. यापूर्वी ते खनिज खात्याचे सचिव होते. त्यांची पत्नी अलरामाई मंगाई डी देखील आयएएस अधिकारी आहे. आयएएस अधिकाऱयांबरोबरच सध्या एका मंडळाचे अध्यक्ष असलेल्या एका माजी आमदाराच्या घरावरही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. शहरातील अनेक ठिकाणी छापे टाकण्याच्या तयारीत 20 वेगवेगळी पथके गुरुवारी रात्री हॉटेल्समध्ये थांबली होती. शुक्रवारी पहाटेच त्यांनी पूर्वनियोजनाप्रमाणे छापेमारी केली.









