रुग्णालय बांधकाम घोटाळ्याप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या 13 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. यात त्यांच्या घराचाही समावेश आहे. आप सरकारच्या काळात आरोग्य व्यवस्थेशी निगडित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात ईडीने जुलै महिन्यात गुन्हे नोंदविले होते. आता याप्रकरणी छापे टाकण्यात आले आहेत. मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या मागे पडले असून ‘आप’ला लक्ष्य केले जात असल्याची प्रक्रिया माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.
मोदी सरकारकडून यंत्रणांच्या गैरवापराचे हे आणखी एक उदाहरण आहे. आम आदमी पक्षाला ज्याप्रकारे टार्गेट केले जात आहे, ते पाहता इतिहासात अशाप्रकारे कुठल्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आले नव्हते. मोदी सरकारच्या चुकीची धोरणे आणि भ्रष्ट कामांच्या विरोधात आम आदमी पक्षच आवाज उठवत असल्याने आमच्या पक्षाला टार्गेट केले जात आहे. मोदी सरकारचा आमचा आवाज दडपू पाहत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.
आपच्या कार्यकाळातील दोन आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांचा 5590 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप आहे. ईडीनुसार 2018-19 मध्ये आप सरकारने 24 रुग्णालय प्रकल्पांना मंजुरी दिली होती. 6 महिन्यांच्या आत आयसीयू रुग्णालये तयार करण्याची योजना होती. परंतु या प्रकल्पांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तर 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला आहे.
दिल्ली सरकारच्या लोकनायक रुग्णालयात निर्मिती खर्च 488 कोटी रुपयांवरून वाढत 1135 कोटी रुपयांवर पोहोचता. अनेक रुग्णालयांमध्ये स्वाक्षरीशिवाय निर्मितीकार्ये सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. शहरभरात रुग्णालये, पॉलीक्लिनिक आणि आयसीयू सुविधा निर्मितीत मोठ्या प्रमाणात अनियमितता, विनाकारण विलंब आणि मोठ्या प्रमाणात निधीची अफरातफरी समोर आल्याचे एसीबीकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात नमूद आहे. तर प्रकल्पांचा खर्च शेकडो कोटींनी वाढविण्यात आला, तर निर्धारित मुदतीत एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही.









