रांची / वृत्तसंस्था
झारखंडमधील दोन काँगेस आमदारांवर ईडीने शुक्रवारी धाड टाकली आहे. कुमार जयमंगलसिंह आणि प्रदीप यादव अशी या आमदारांची नावे आहेत. या आमदारांकडे मोठय़ा प्रमाणात अवैध संपत्ती आहे असा आरोप आहे. रांची, बोकारो, गोड्डा आदी शहरांमध्ये या आमदारांच्या 9 मालमत्तांवर धाडीची कारवाई करण्यात आली, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
याचप्रमाणे राज्यातील महत्वाचे कोळसा व्यापारी अजय कुमार सिंग यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. रांची येथील न्यूक्लिअस मॉलचे मालक विष्णू अग्रवाल, आणखी एक उद्योजक शिवशंकर यादव व अन्य काही व्यक्तींची निवासस्थाने आणि कार्यलयांवरही ईडीने धाडी टाकल्या आहेत.
जे नेते भाजपचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर धाडी पडतात, असा आरोप जयमंगलसिंह यांनी केला आहे. झारखंड राज्यात केल्या सहा महिन्यांमध्ये ईडी आणि प्राप्तीकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठविले आहे. सोरेन यांच्या दोन सहकाऱयांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. 11 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. त्यामुळे ईडी राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. काँगेसने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे.
अनेक उद्योगपतींवर कारवाई
रियल इस्टेट उद्योगपती विष्णू अग्रवाल, चैबासा येथील लोहखनिज व्यापारी राजकुमार शाह (शाह ब्रदर्स) बेरमो येथील कोळसा व्यापारी अजय सिंग यांची निवासस्थाने आणि कार्यालयांवरही ईडीने छापे घातले आहेत. या छाप्यातून काही महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच रोख रक्कमही ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती प्रवक्त्यांकडून देण्यात आली.









