मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ चेन्नई
ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सोमवारी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे शिक्षणमंत्री के. पोनमुडी आणि त्यांचे खासदारपुत्र गौतम सिगामणि यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. राज्याची राजधानी चेन्नई आणि विल्लुपुरममध्ये पितापुत्राच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोनमुडी हे राज्याचे खाणमंत्री (2007 आणि 2011 दरम्यान) असताना झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोनमुडी हे खाणमंत्री असताना खाणपरवाना अटींचे उल्लंघन झाल्याचे आरोप असून यामुळे शासकीय तिजोरीला सुमारे 28 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ईडीने अलिकडेच द्रमुक नेते आणि मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर कारवाई केली आहे.
मंत्री पोनमुडी यांच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकल्यावर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी उपरोधिक टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आता प्रचारमोहिमेत झाली आहे. पोनमुडी यांच्या विरोधात सुमारे 13 वर्षांपूर्वी खोटा आरोप करण्यात आला होता असा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.
तामिळनाडूत राज्यपाल आर.एन. रवि हे पूर्वीपासूनच आमच्यासाठी निवडणूक मोहीम राबवत आहेत, आता ईडी यात सामील झाली आहे. यामुळे निवडणुकीतील आमचा विजय सोपा झाला आहे. ईडीकडून होणारी कारवाई ही लक्ष विचलित करण्यासाठी केली जाते. हे एकप्रकारचे रचलेले नाटक आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता योग्य प्रत्युत्तर देणार असल्याने द्रमुकला चिंता नसल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.









